भरदिवसा घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांचा प्रतिकार करणाऱ्या जेष्ठ महिलेला चोरांनी केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागला. अज्ञात चोरांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली आहे. अज्ञात चोरांनी कपाट उघडून त्यातील १ लाखापेक्षा जास्त रुपये घेऊन पळ काढला.  रेश्मा पुरुषोत्तम बन्सल (वय-७०) असे चोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे.

ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघड झाली असून लोणावळा शहरातील द्वारका माई सोसायटी येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या रेश्मा यांची दोन्ही मुले पुणे शहरात असून ते सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) आहेत. तर पाच मुलींचा विवाह झाला असून इतर शहरात राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या रेश्मा पुरुषोत्तम बन्सल यांच्या पतीचे किराणा मालाचे दुकान असून घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. ते दोघेच लोणावळा शहरात राहात होते. नेहमी प्रमाणे सकाळी आठच्या सुमारास पती किराणा दुकानात गेले. त्यानंतर सकाळी नऊ च्या सुमारास रेश्मा  त्यांचे पती पुरुषोत्तम यांना नाश्ता घेऊन गेल्या होत्या, त्यानंतर त्या घरी परतल्या. दुपारच्या जेवणाचा डबा घेण्यासाठी दुकानावर एक व्यक्ती आला.  त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने दुकानात जाऊन मालकाला सांगितले की मावशी  या दरवाजा उघडत नाहीत.

यानंतर घरी सगळेचजण आले.  त्यांनी पाठीमागील दरवाजाने आत प्रवेश केला. रेश्मा या निपचित पडल्या होत्या, दरम्यान, कोणालाच त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची संशय आला नव्हता. पुरुषोत्तम यांनी तातडीने रेश्मा यांना रुग्णालयात नेले, परंतु, काही वेळानंतर डॉक्टरांनी रेश्मा यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. घरातील हॉलमध्ये मृतदेह ठेवण्यात आला. मात्र, तेव्हाच घरातील कपाट उघडे दिसले आणि संशय बळावला. घरात चोरी झाल्याचे समोर आले. दरम्यान, लोणावळा शहर पोलिसांना याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर पाटील हे त्यांच्याच दुचाकीवर घटनास्थळी दाखल झाले.

रेश्मा यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसत नाहीत. चोरी करण्यासाठी आलेल्या अज्ञात चोरांचा रेश्मा यांनी प्रतिकार केला असल्याने त्या झटापटीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याच प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. नैसर्गिक मृत्यू नसल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील हे करत आहेत.