पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराचा ताबा गाडे गुरव यांच्याकडून काढून विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.
अनेक दशकांपासून मंदिराची मिळकत व संपत्ती ही गाडे कुटुंबाकडे होती. धर्मादाय आयुक्तांनी २००७ साली मंदिराच्या व्यवस्थापनाची आखणी केली. त्यानुसार मंदिराची सर्व मिळकत, पूजाअर्चा यासह सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी विश्वस्तांकडे देण्यात आली. मंदिराच्या मिळकतीवरून विश्वस्त मंडळ आणि मंदिराचे पुजारी यांच्यात गेली अनेक वर्षे वाद सुरू होता. धर्मादाय आयुक्तांच्या सूचनांनुसार मंदिराच्या पुजाऱ्यांना गाभाऱ्यातील दानपेटीतील रकमेशिवाय अन्य कोणतीही रोख रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र या सूचनेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्याने विश्वस्तांनी त्याबाबात न्यायालयात दाद मागितली होती.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने धर्मदाय आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मंदिराची मिळकत न्यायालयामार्फत विश्वस्तांकडे सोपवण्यात आली असून यापुढे सरकारी आदेशाप्रमाणे मंदिरातील कोणतेही धार्मिक कार्यक्रम देवस्थानच्या कार्यालयामार्फतच करण्यात येणार आहेत, असे विश्वस्त धनोत्तम लोणकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.