प्राची आमले

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने वंचितांसाठी तसेच दुर्गसंवर्धनासाठी काम करणाऱ्या युवकांच्या गटाविषयी..

अनेकदा नवीन काही माहिती हवी असली की आपण ती शोधण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतो. इंटरनेटमुळे आपल्याला लाभलेल्या फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर या समाजमाध्यमांनी आपल्या दैनंदिन जगण्यात आमूलाग्र बदल केले आहेत. इंटरनेटवर  खरेदी, सामाजिक जाणिवेतून सुरू झालेली तर अनेक कामे आपण पाहिली आहेत. एखादा उपक्रम कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायचा असेल तर समाजमाध्यमांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम सध्या तरी नाही. समाजमाध्यमांचे हेच छुपे सामर्थ्य ओळखून व्हॉट्स अ‍ॅप वर सध्या दिवाळी निमित्त वेगवेगळ्या गटांतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या अशाच एका युवकांच्या गटाविषयी आपण माहिती घेणार आहोत.

‘छत्रपती युवा संघा’ची स्थापना आठजणांच्या मित्रांच्या गटाकडून करण्यात आली आहे. गटातील सर्व व्यक्ती दुर्गप्रेमी असून काही नोकरी व शिक्षण घेत आहेत. समाजात अनेक समस्या असून फक्त त्यावर चर्चा करून थांबत नाहीत, तर आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून गटातर्फे वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा,  मुक्कामाच्या ठिकाणी वारक ऱ्यांना तेलाचे वाटप, गडांवर-वारीमध्ये स्वच्छता मोहीम आणि वंचित लोकांना मदत यासारखे निरनिराळे उपक्रम राबविले जातात.

गटाचा स्वयंसेवक अभिजीत जावळकर म्हणाला, संघाची सुरुवात फक्त आठ मित्रांपासून झाली. दिवाळी हा आनंदाचा, दिव्यांचा सण संपूर्ण देशात हा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. परंतु या काळात गड-किल्ले मात्र अंधारात असतात. तसेच अनेक लोक हा सण साजरा करत नाहीत, ही गोष्ट कायमच अस्वस्थ करीत होती. त्यामुळे हा सण सर्वाना साजरा करता यावा म्हणून दिवाळीत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

फक्त दीपोत्सव, दुर्गसंवर्धनावर न थांबता या वर्षीपासून समाजातील वंचित व्यक्तींना दिवाळी भेट तसेच वसतिगृह किंवा अनाथ आश्रमातील  विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी  संगणक भेट देण्यात येणार आहे. हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षाची मदत घेतली जात नाही. गटातील सर्व सहभागी व्यक्ती आपल्या महिन्याच्या खर्चातील एक ठराविक रक्कम ही अशा उपक्रमांसाठी काढून ठेवतात. या वर्षी दीपोत्सवाच्या उपक्रमाचे खास आकर्षण रांगोळी असून किल्ल्याच्या पायथ्यापासून ते शिवाई माता मंदिरापर्यंत रांगोळी काढण्यात येणार आहे. ही रांगोळी काढण्यासाठी  खास नाशिक हून तेज आर्ट क्रि एशन हा ग्रुप सहभागी होणार असून ११५० पणत्यांचे प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

उपक्रमातील समाजमाध्यमांच्या भूमिकेविषयी जावळकर म्हणाला, आम्ही काही मित्रांनी या गटाची स्थापना केली. गटातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती समाजमाध्यमांमुळे  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. समाजमाध्यमांमुळे  अनेक स्वयंसेवक जोडले गेले. सध्या संघाचा फक्त व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप असून येत्या काळात फेसबुक पेजदेखील सुरू करण्यात येणार आहे. गटातील व्यक्तींकडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्यासाठी ७७४४९०५१७९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.