कमी दाबाचे पट्टे क्षीण होत असल्याने रविवारपासून (२१ फेब्रुवारी) राज्यावरील पावसाळी सावट दूर होण्याची शक्यता आहे.
शनिवारी (२० फेब्रुवारी) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.
समुद्रातून येणारे बाष्प आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० फेब्रुवारीला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील. २१ फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कोरडय़ा हवामानाची स्थिती राहील.
मुंबई परिसरात शिडकावा
सलग दुसऱ्या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई परिसरांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. नवी मुंबईत बेलापूर, पावणे औद्योगिक वसाहत आणि मुंब्रा येथे अर्धा ते एक मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ९च्या दरम्यान मंत्रालय, सीएसएमटी परिसरात हलका पाऊस झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:25 am