वय झाले असले तरी उमेद तीच.. फडर्य़ा आवाजामध्ये लावणीचे बोल सुरू होताच ढोलकीवर पडणारी थाप.. वयाच्या ८३ व्या वर्षीही तेवढय़ाच ताकदीने सादर झाली ‘गाडी आणावी बुरख्याची’  ही लावणी.. लावणी गातानाच त्याला नृत्याची जोड देत सादर झालेली अदा.. शिट्टय़ा-टाळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांनी रसिकांना जिंकले. ‘पठ्ठे बापुरावांची छक्कड.. लावणी झाली फक्कड’ हे दृश्य रसिकांनी मंगळवारी साक्षात अनुभवले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित पुणे लावणी महोत्सवाचे उद्घाटन गुलाबबाईंच्या हस्ते चक्क लावणी सादर करून झाले. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, उद्योजक प्रसाद लाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिका सभागृहनेते बंडू केमसे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया या वेळी उपस्थित होते.
लावणी बघू नये हा संस्कार बालवयात झाला, पण ढोलकीचा नाद आणि फर्डा आवाज ऐकल्यानंतर कनात वर करून लावणी बघण्याचा मोह आवरता आला नाही, अशी कबुली तटकरे यांनी दिली. वयाच्या ८३ व्या वर्षीही लावणीवरचे प्रेम सिद्ध करून गुलाबबाईंनी कलेचा बाज श्रेष्ठ असतो याचे दर्शन घडविले. या महोत्सवामध्ये शिट्टी वाजवू नये असा नियम शिथिल करायला हवा. शिट्टी वाजल्याखेरीज लावणी कलाकाराला प्रोत्साहन मिळत नाही, अशी सूचना त्यांनी संयोजकांना केली.
‘‘मराठी माणूस हा रासवट असतो. त्याच्या रासवटपणाला शोभणारी लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. लहानपणी मीही चोरुन विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशा पाहिला होता,’’ असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. या महोत्सवातील सहभागी संघांचा अपघाती विमा उतरविण्यात येणार असल्याचे खाबिया यांनी सांगितले.

लावणीचा घरंदाजपणा हरवला
लावणी ही शंृगारिक कला आहे. मात्र, लावणी ही घरंदाज आहे. हा लावणीचा घरंदाजपणा हरवला असून आता लावणीमध्ये धांगडधिंगा वाढला असल्याची खंत गुलाबबाई संगमनेरकर यांनी व्यक्त केली. लावणीची म्हणून एक अदा असते. घुंगराचे पाय हे व्यवस्थितच पडले पाहिजेत. केवळ काही लोकांसाठी नाही तर, तिकिट काढून येणाऱ्या प्रत्येकाकडे बघून अदा झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मी मोफत लावणी शिकवायला तयार आहे, पण नव्या मुली चित्रपट गीतांच्या चालीवरच लावणी सादर करण्याला प्राधान्य देत असल्यामुळे शिकण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.