एखादी एकांकिका घडण्याच्या प्रवासात त्या संघातल्या प्रत्येकाला काहीतरी मिळत असते. एकांकिका जशी मित्रमैत्रिणींना एकत्र जमून ‘टीपी’ करण्याचे आयते निमित्त देते तशीच ती ‘टीम वर्क’ची शिस्तही शिकवते, असा अनुभव ‘लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीतील स्पर्धकांनी व्यक्त केला.
पुणे, विदर्भ आणि मराठवाडा अशा ठिकठिकाणाहून आलेल्यांचा एकांकिकेतला मेळ ‘सिंहगड’च्या संघासाठी शिकवणारी गोष्ट ठरली. ‘प्रत्येकाच्या भाषेचा वेगळा लहेजा आणि वेगळी संस्कृती या निमित्ताने समजून घेता आली. ‘सीनिअर’ आणि ‘ज्युनिअर’ हा भेद एकांकिकेत मुळीच आड आला नाही. ज्युनिअर्स एखादी गोष्ट विसरले- अगदी नाटकाची ‘प्रॉपर्टी’ विसरून आले तरी सीनिअर्सनी समजून घेतले,’ असे ‘टीम सिंहगड’ने सांगितले.
एकांकिकांमुळे आपण ‘सीरिअस’ होतो, शिस्त लागते, असे ‘बीएमसीसी’च्या संघाचे म्हणणे आहे. टीम बीएमसीसीच्या म्हणण्यानुसार, ‘नाटकामुळे एकमेकांवर विश्वास टाकण्याची वृत्ती तयार होते. अभिनेते, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक सगळे ‘त्या’ ६० मिनिटांसाठी झगडत असतात. प्रत्येक प्रयोग नवा व्हावा, त्यात यांत्रिकपणा येऊ नये यासाठी प्रयत्न करताना प्रत्येक जण ‘रिफ्रेश’ होतो.’
परीक्षा सुरू असल्यामुळे सर्व जण तालमीला उपस्थित आहेत असे एकदाही घडले नाही, पण ‘कॅप्टन ऑफ द शिप’ने अर्थात दिग्दर्शकाने सगळय़ांना सांभाळून घेतले, असा अनुभव ‘टीम फग्र्युसन’ने सांगितला. ‘टीम गरवारे’ म्हणाले, ‘आम्ही तालीम दिवसातून चार-पाच तासच करत होतो, पण त्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन खेळ खेळायचो, ‘टाइमपास’ करायचो.’ ‘टीम एमआयटी’मधील कलाकारांनी आपल्या भूमिका आत्मसात करण्यासाठी चक्क सारसबागेत जाऊन कुटुंबांचे निरीक्षण केले, लहान मुलीने हट्ट करणे, खेळणे हेही करून पाहिले.
‘आय स्क्वेअर आयटी’ महाविद्यालयाच्या संघातले सगळेच नवीन होते. एकांकिकेचा प्रवास पहिल्यांदाच मंचावर येणाऱ्या सगळय़ांना बरेचसे शिकवून गेला, असे या टीमने सांगितले. ‘सीनिअर्सकडून नाटकाची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाने दिलेले पाठबळ आणि ‘सबमिशन’च्या बदलून दिलेल्या तारखा हेही खूप महत्त्वाचे ठरले. टीममधल्या प्रत्येकाचा वेगळय़ा स्वभावाशी जुळवून घेत एकांकिका बसवताना आत्मविश्वास वाढला,’ असे टीम आय स्क्वेअर आयटीने सांगितले.