बहुचर्चित असणाऱ्या ‘विनोदोत्तम करंडक’ची मानकरी यंदा संक्रमण पुण्याची ‘रात की एक बात’ ही एकांकिका ठरली. तर द्वितीय एमआयटीओईच्या ‘आम्ही सारे तोत्रे’या एकांकिकेला आणि तृतीय क्रमाकांचे पारितोषिक प्रतिबिंबच्या ‘जांगलबुत्ता’ने पटकावले.
वन किंड फाउंडेशनच्या वतीने आयोजित विनोदोत्तम करंडक स्पर्धेच्या विजेत्यांना नुकतेच अभिनेते नंदू पोळ, अभिनेत्री पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या वेळी लेखक डॉ. मुरहारी काळे, वन किड फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, उपाध्यक्ष मनोहर कोलते, विनोदोत्तमचे संस्थापक व फाउंडेशनचे सचिव हेमंत नगरकर आदी उपस्थित होते. मनोहर कोलते पुरस्कृत दादा कोंडके पारितोषिक दहा हजार, करंडक व प्रशस्तिपत्र देऊन प्रथम क्रमांक विजेत्या संघाला गौरविण्यात आले. या वेळी पानसे यांनी फाउंडेशनची स्थापना, उद्दिष्टे आणि भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून भालचंद्र पानसे, दिलीप जोगळेकर आणि शिरीष कुलकर्णी यांनी काम केले. यंदा ३२ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.