वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी अटक केली. टिंबर मार्केट परिसरात शनिवारी (२३ जुलै) सायंकाळी ही घटना घडली.
पंकज उर्फ अप्पा सतीश साळवे (वय २४, रा.६३३, गंज पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार मारिओ तुकाराम साळवे (वय २२,रा.६३३ गंज पेठ) याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश मोहनलाल ओसवाल (वय ४२,रा. भवानी पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसवाल यांचे भवानी पेठेतील टिंबर मार्केट भागात प्लायवुड विक्रीचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी साळवे ओसवाल यांच्या दुकानात शिरले. अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवासाठी दोघांनी २५ हजार रुपयांची वर्गणी मागितली. ओसवाल यांनी त्यांच्याकडे मागील वर्षीच्या वर्गणीची पावती मागितली तेव्हा साळवे तेथून निघून गेला. काही वेळानंतर साळवे पुन्हा ओसवाल यांच्या दुकानात शिरले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. वर्गणी नाही दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देऊन त्यांनी ओसवाल यांना मारण्यासाठी शस्त्र उगारले. त्या वेळी ओसवाल यांचे मित्र संदीप पाटोळे यांनी दोघांना अडविले. ओसवाल यांच्या दुकानातील कामगारांनी आरोपी पंकज साळवे याला पकडले. दरम्यान त्याचा साथीदार मारिओ तेथून पसार झाला होता,मात्र पोलिसांनी आरोपी साळवे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.