फर्ग्युसन महाविद्यालयाचे बनावट लेटरहेड तयार करून त्याद्वारे या ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयाने तक्रार दिल्यानंतर डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी एका भामटय़ाला अटक केली आहे.
नितीन भाऊराव त्रिभुवन (वय ३२, रा. थेरगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह गोविंदसिंह परदेशी (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन याने फर्ग्युसन महाविद्यालयाचे बनावट लेटरहेड तयार केले. या ठिकाणी कोणत्याही पदाची भरती नसताना त्या लेटरहेडवर प्राचार्याच्या खोटय़ा सह्य़ा करून त्याद्वारे आबासाहेब जानकर, मिलिंद कांबळे आणि इतर व्यक्तींकडून पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या नावाचा बेकायदेशीरपणे वापर करून संस्थेच्या लौकिकास हानी पोहचविण्याचा प्रयत्न केला. संस्थेची व महाविद्यालयाची बदनामी करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली म्हणून प्राचार्य डॉ. परदेशी यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तपास करून त्रिभुवनला अटक करण्यात आली आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले असता हे लेटरहेड कोठे बनविले. आरोपीचे साथीदार कोण आहेत. आणखी किती लोकांची फसवणूक केली. याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती मागणी मान्य करत न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 2:35 am