इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय गोविंद धांडे (वय ५८, रा. पाषाण) यांची इंटरनेट बँकिंगद्वारे १९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी मुंबई येथून एकाला अटक केली आहे. धांडे यांच्या खात्यावरून मुंबई, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील बँकेच्या अकरा खात्यांवर पैसे हस्तांतरित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
विनायक महादेव तिरलोटकर (वय २५, रा. लोअर परळ, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी तिरलोटकर हा एका खासगी कंपनीत कामाला असून त्याच्या नावाने मुख्य आरोपींनी मुंबईतील फोर्ट भागातील आयसीआयसीआय बँकेत तीन खाती उघडली आहेत. त्या खात्यावर धांडे यांच्या खात्यातून एक लाख रुपये हस्तांतर करण्यात आले होते. त्या बदल्यात तिरलोटकर याला तीन टक्के कमिशन देण्यात आले आहे. त्यातील एक खाते तिरलोटकर स्वत: वापरत असल्याची माहिती मिळताच सायबर शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. धांडे यांच्या खात्याबरोबर तीन राज्यांतील एकूण ११ खात्यांवर पैसे हस्तांतरित झाले असून ते १२ वेळा काढून घेण्यात आले, अशी माहिती तपासात समोर आली आहे. तिरलोटकर याला न्यायालयाने १४ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
औंध रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेत धांडे यांचे खाते असून ६ आणि ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यावरील १९ लाख दहा हजार रुपये इंटरनेट बँकिंगद्वारे काढण्यात आले होते. त्या अगोदर धांडे यांचे सीमकार्ड आरोपींनी बंद केले होते. अशाच प्रकारे पुण्यात तिघांची फसवणूक झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून शोध सुरू केला होता. धांडे यांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्य़ाचा तपास सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त संजय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त गोपीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय तुंगार हे करत आहेत.