‘डीएम डॅशबोर्ड’ कार्यान्वित :-   केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, जिल्ह्य़ात सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती आदी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘डीएम डॅशबोर्ड’ कार्यान्वित करण्यात आला असून त्यामुळे शहरासह जिल्ह्य़ातील प्रकल्पांची सद्य:स्थिती दैनंदिन स्वरूपात समजणार आहे.

प्रशासकीय कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. राज्य शासनाने जुलै महिन्यात ‘सीएम डॅशबोर्ड’ कार्यान्वित केला. त्या धर्तीवर जिल्हाधिकारी यांचा ‘डीएम डॅशबोर्ड’ राष्ट्रीय माहिती केंद्र (नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर – एनआयसी) पुणे यांनी तयार केला आहे.

हा डॅशबोर्ड तयार झाल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना केंद्र, राज्य शासनाच्या योजनांचा एकीकृत, विश्लेषणात्मक आढावा घेणे शक्य होणार आहे. तसेच शासकीय सर्व योजनांची माहिती आकडेवारीसह तसेच सर्व विभागांची कामगिरी एका दृष्टिक्षेपात निदर्शनास येणार आहे. या सुविधेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचा आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या कामगिरीचा थेट आढावा घेता येईल, अशी माहिती एनआयसीचे वरिष्ठ अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात जिल्हाधिकारी व्यस्त असल्याने ही सुविधा संकेतस्थळावर येऊ शकली नव्हती. मात्र, निवडणूक आणि निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने ही सुविधा आता कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सुविधा जिल्हाधिकारी यांच्यासाठी आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठीचा भामा आसखेड प्रकल्प, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडून करण्यात येणारे वर्तुळाकार रस्ते, मेट्रो प्रकल्प, पालखी मार्ग यांसह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे, विविध शासकीय योजनांची माहिती, प्रगती या डॅशबोर्डद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना समजणार आहे.

सीएम डॅशबोर्डच्या धर्तीवरच डीएम डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. तो कार्यान्वितही करण्यात आला आहे. त्यानुसार दैनंदिन, आठवडा, पंधरा दिवस आणि एक महिना अशा विविध प्रकारांमध्ये प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी संबंधित प्रकल्पाच्या वेब सव्‍‌र्हिसमधून संगणक प्रणालीच्या माध्यमातून थेट डीएम डॅशबोर्डवर ही माहिती अद्ययावत होईल. ही सुविधा एनआयसी पुणेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. – धनंजय कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी, एनआयसी पुणे