नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन

पिंपरी पालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन केरळ पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही या मदतनिधीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याची भूमिका घेतली आहे.

केरळ येथे पुराने थैमान घातले असून तेथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातील नागरिकांनी केरळवासीयांना मदतीचा हात दिला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन देण्याची घोषणा २० ऑगस्टला झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानंतर, महापालिका कर्मचाऱ्यांनीही या मदतनिधीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी दर्शवली आहे. कर्मचारी महासंघाने तसे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे.

त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांकडून एक दिवसाचे वेतन देण्यात येणार आहे. नगरसेवक, कर्मचारी व अधिकारी यांच्या एकत्रित रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात येणार आहे. तशी कार्यवाही करण्याची सूचना पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रकाद्वारे लेखा विभागास केल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.