टाकळी हाजी परिसरातील घटना

पुणे : वाळू उपशाच्या ठेकेदारीतून मिळालेल्या पैशांच्या वादातून शिरूरमधील टाकळी हाजी गावात एकावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला असून त्याच्याबरोबर असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे.

स्वप्नील रणसिंग (वय ३१, रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. गोळीबारात पप्पू गावडे गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांकडून विजय शेडगे आणि बबलू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणसिंग, गावडे आणि आरोपी शेडगे मित्र आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वाळू उपशाच्या ठेकेदारीतून वाद झाला होता. रणसिंग आणि आरोपींमध्ये झालेला वाद आर्थिक कारणावरून झाला होता. सोमवारी (१८ जानेवारी) दुपारी सव्वा

बाराच्या सुमारास रणसिंग आणि गावडे टाकळी हाजी गावात थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेले आरोपी शेडगे आणि बबलू यांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून रणसिंग आणि गावडे यांच्यावर बेछूट गोळीबार केला.

आरोपींनी रणसिंगवर चार गोळ्या झाडल्या तसेच गावडेवर एक गोळी झाडण्यात आली. गावडेच्या पोटाला गोळी घासून गेल्याने तो बचावला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.