अँटिजेन चाचण्या आजपासून सुरू

पुणे : करोनाबाधित, संशयित रुग्णांचे तातडीने निदान व्हावे या दृष्टीने उपयुक्त ठरणारी रॅपिड अँटिजेन किट महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार बुधवारपासून टप्प्याटप्प्याने या किटद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे पाऊण तासात रुग्णाचा अहवाल प्राप्त होणार असून करोना संसर्ग रोखण्यासही त्यामुळे मदत होणार आहे. सध्या महापालिके ने एक लाख किटची खरेदी के ली असून त्याद्वारे एक लाख नागरिकांची तपासणी होणार आहे.

शहरातील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे पाचशेच्या पुढे गेली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिके कडून विविध स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी रॅपिड अँटिजेन किटची खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती.  या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी महापालिके ला एक लाख किट प्राप्त झाले आहेत. या किटद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येईल. या किटद्वारे तपासणी के ल्यानंतर पाऊण तासात त्याबाबतचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे करोनाबाधितांचे वेळेवर निदान करता येणे शक्य होणार असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. अँटिजेन चाचणीमुळे करोनाबाबतचे शहरातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. करोना स्वॅब चाचण्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ससून रुग्णालय प्रयोगशाळा आणि खासगी प्रयोगशाळा यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. अँटिजेन चाचण्या सुरू के ल्याने हे अवलंबित्व कमी होईल. एवढेच नव्हे तर स्वॅब चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत किमान एक दिवसाचा वेळ जातो. करोना बाबत भीतीमुळे हा वेळ नागरिकांना तणावामध्ये घालवावा लागतो. अँटिजेन चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर अल्पावधीतच त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे सर्वार्थानेच अँटिजेन चाचणी महत्त्वाची ठरेल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारपासून टप्प्याटप्प्याने या किटचा वापर सुरू होणार आहे. जास्त संसर्ग असलेल्या ठिकाणी त्याचा पहिल्या टप्प्यात वापर करण्यात येईल. किट वापरासंदर्भात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून गुरुवार-शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

आर्थिक भार होणार हलका

करोनाच्या स्वॅब चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना २५०० रुपये एवढे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अँटिजेन चाचणीची किं मत ४५० रुपये एवढी असून त्यावर अल्प प्रमाणात जीएसटी लागणार आहे. म्हणजेच चाचणीचे शुल्क काही हजारांवरून काहीशे रुपये एवढे कमी होणार आहे. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक भारही हलका होणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.