पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक असे तीन नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक करोना बाधित आढळल्याने शहरात खळबळ उडाली असून दररोज एक रुग्ण आढळत असल्याने भीतीचे वातावरण शहरभर आहे. पुणे शहरात ८ तर पिंपरी-चिंचवड शहरात ११ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांची संख्या १९ वर पोहचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईतही एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. अमेरिकेहून हा रुग्ण परतल्याची माहिती आहे. रत्नागिरीतील करोना बाधित रुग्ण दुबईहून आल्याची माहिती आहे. राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या आता ४५ पर्यंत पोहोचली आहे.

फिलिपिन्स येथून प्रवास करून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या एका व्यक्तीचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आले आहे. शहरात एकूण ११ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयामधून आज पर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे करोना चाचणीकरीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले होते.

त्यापैकी आज एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून उर्वरीत चार व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. या सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना घरी सोडण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.