शहरात एकाच भागात शहरी वस्त्या आणि झोपडपट्टय़ांमध्ये संशयित डेंग्यू रुग्णांचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. झोपडपट्टय़ांमध्ये संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या तुलनेने कमी असून शहरीकरण झालेल्या भागांमध्येच हे रुग्ण अधिक प्रमाणात सापडले आहेत. वारजे भागातल्या शहरी वस्त्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, वारज्यातल्याच झोपडपट्टय़ांमध्ये मात्र केवळ ३ संशयित डेंग्यू रुग्ण सापडले आहेत.पालिकेच्या आरोग्य विभागाने पुरवलेल्या जानेवारीपासून २० ऑगस्ट अखेरच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण १८० संशयित डेंग्यू रुग्ण सापडले होते. यातले १२५ रुग्ण शहरी वस्त्यांमधील तर ५५ झोपडपट्टीत राहणारे होते. शहरी वस्त्यांचे चित्र पाहता २३ संशयित डेंग्यू रुग्णांसह वारजे, नगर रस्ता (१८ संशयित रुग्ण), विश्रामबाग वाडा (१७ रुग्ण), घोले रस्ता व टिळक रस्ता (प्रत्येकी ११ रुग्ण) या ठिकाणी डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे. झोपडपट्टय़ांमध्ये मात्र संगमवाडी (१२ संशयित डेंग्यू रुग्ण), नगर रस्ता (९ रुग्ण), भवानी पेठ आणि ढोले पाटील रस्ता (प्रत्येकी ७ रुग्ण) या ठिकाणी संशयित डेंग्यू रुग्ण अधिक आहेत. एकाच भागातल्या शहरी वस्त्या आणि झोपडपट्टय़ांमध्ये डेंग्यू रुग्णांचे प्रमाण व्यस्त असून विश्रामबाग वाडा भागातील झोपडपट्टीत संशयित डेंग्यू रुग्ण नाहीच, तर शहरी वस्त्यांत भवानी पेठेत केवळ १ रुग्ण आढळला आहे. पालिकेच्या कीटकजन्य विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर म्हणाले, ‘झोपडपट्टय़ांमध्ये घरे जवळ-जवळ असल्यामुळे डेंग्यूसदृश आजारांचा फैलाव अधिक होण्याची शक्यता असते. परंतु या भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण कमी आढळत आहेत. सोसायटय़ांमधील नागरिक धूर फवारणी व कीटकनाशक फवारणीसाठी तयार होत नाहीत. तसेच सोसायटय़ांची गच्ची, घरातील फ्लॉवरपॉटसारखे सामान, फ्रिज या जागा डासांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. एप्रिलपासून आतापर्यंत आम्ही ४,२२४ ठिकाणी डासांच्या पैदाशीसंबंधी नोटिसा बजावल्या असून त्यातही सोसायटय़ाच सर्वाधिक आहेत.’

डासांच्या पैदाशीबद्दल  ४५ हजारांचा दंड
डासांची पैदास झाल्याबद्दल पालिकेने २० जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत एकूण ४५,६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात टिळक रस्ता, भवानी पेठ, विश्रामबाग वाडा, सहकारनगर या भागात १५ हजारांचा दंड झाला आहे, तर ढोले पाटील रस्ता, नगर रस्ता आणि संगमवाडीत १२ हजारांचा दंड बजावण्यात आला आहे.