दादर येथे हमाली काम करणाऱ्या एकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी पिस्तुलांची विक्री प्रकरणात अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

धोडिंबा विठ्ठल ढेबे (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा वेल्हा तालुक्यातील कुसारपेठ येथील रहिवासी आहे. ढेबे हा शस्त्रविक्रीसाठी येणार असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस पथकातील कर्मचारी दयानंद तेलंगे आणि दत्ता सोनवणे यांना मिळाली होती. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या नातलगांकडे तो आला होता. त्याच्याकडे शस्त्र असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून त्याला प्रयेजा सिटी येथे बोलावून घेतले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. तपासणीत त्याच्याकडे शस्त्र सापडली.

दादर येथे हमाली करत असताना ढेबेची ओळख एका परप्रांतीयाशी झाली होती. त्याच्याकडूनच ढेबे याने १५ हजार रूपयांत गावठी पिस्तूल आणि काडतुसे खरेदी केली होती. त्याच्याकडूनच नंतर पाच हजार रूपयांचा देशी कट्टाही खरेदी केला. शस्त्र व्यवस्थित चालते की नाही, हे पाहण्यासाठी त्याने दोन गोळ्या हवेत झाडल्या होत्या, असे उपनिरीक्षक गिरीश सोनवणे यांनी सांगितले. ढेबे हा सराईत गुन्हेगार नाही. मात्र, १५ हजारात घेतलेले पिस्तूल २० ते २५ हजारांना विकण्याचा त्याचा प्रयत्न होता.