पिंपरी-चिंचवडमध्ये वीजेच्या डीपीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी पावणे तीनच्या सुमारास काळेवाडी फाटा ते डांगे चौक या बीआरटी मार्गालगत असलेल्या डिपीला आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली. आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे. पण ती मृत व्यक्ती कोण होती आणि डिपीजवळ काय करत होती याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

तर, दुसऱ्या एका घटनेत दारूच्या नशेत सिगारेट ओढणं एका वृद्धाच्या जीवावर बेतलंय.  मोकळ्या जागेवर सिगारेट पेटवून पेटती माचीस खाली फेकल्याने, गवताला आग लागली. यात ते पन्नास टक्के भाजलेत. पिंपरी चिंचवडमध्येच ही घटना घडली आहे. अशोक जाधव असं 65 वर्षीय भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे. शनिवारी रात्री ते दारू पिऊन, एका मोकळ्या जागी सिगारेट ओढत होते. सिगारेट पेटवून पेटती माचीस गवतावर फेकली. बघता-बघता आग वाढली, दारूच्या नशेत असल्यानं अशोक जाधव यांना काय करावं हे लक्षात आलं नाही. तितक्यात आगीत ते फसले आणि पन्नास टक्के भाजले. दोन तरुणांनी त्यांना घरी आणून सोडल्यानंतर घडला प्रकार समोर आला. तातडीनं त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अशोक पत्नी आणि मेहुणीसोबत पिंपरीत राहतात. आठ महिन्यांपूर्वीही ते हरवले होते अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.