‘एक सोसायटी एक झाड’ उपक्रमाला लाभले हरित यश
सध्याच्या काळात वृक्षारोपण उत्साहाने केले जाते खरे. पण, त्याची जोपासना करण्यासंदर्भात तेवढा उत्साह टिकून राहताना दिसत नाही. असे चित्र असताना औंध येथील सोनल सराफ २००९ पासून एक सोसायटी एक झाड उपक्रम राबवित आहेत. आतापर्यंत १५ सोसायटय़ा आणि तीन शाळांमध्ये सराफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झाडे जगविण्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी वृक्षारोपण केलेल्या १०० झाडांपैकी ६० ते ७० झाडांची उंची २० ते २५ फुटापर्यंत वाढली आहे. ‘एक सोसायटी एक झाड’ या त्यांच्या उपक्रमाला हरित यश लाभले आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा सगळेजण देतात. मोठय़ा उत्साहाने वृक्षारोपणही केले जाते. मात्र त्यांचे संगोपन न केल्यामुळे पुढच्या वर्षी त्याच खड्डय़ामध्ये नवीन रोपे त्यात लावली जातात. हेच चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे दरवर्षी एका सोसायटीमध्ये किमान एक झाड लावून ते जगवलं तर काही वर्षांत आपला आजूबाजूचा परिसर हिरवागार होऊन जाईल, असा विचार मनात आला. शुभ कार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी या उद्देशातून ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्याच सोसायटीमध्ये वृक्षारोपणाने श्रीगणेशा केला, असे सोनल सराफ यांनी सांगितले. औंध परिसरात पाचशेहून अधिक सोसायटय़ा आहेत. प्रत्येक सोसायटीने एक झाड लावले तर एका वर्षांत पाचशे झाडे लावली जातील आणि ही झाडांची संख्या वाढत जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा उपक्रम राबविताना संपर्कातील सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. हा संपर्क वृद्धिंगत करण्याच्या उद्देशातून ‘एसएमएस ग्रुप’चा जन्म झाला. याच ग्रुपच्या माध्यमातून औंध परिसरातील वेगवेगळ्या सोसायटय़ांमधील लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सोसायटीमध्ये एक झाड लावण्यात आले.
काही ठिकाणी वाया जाणारे पाणी या झाडांना मिळावे अशा पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. आठवडय़ातून एकदा किंवा सुट्टीच्या दिवशी सराफ आणि त्यांचा मित्रपरिवार या झाडांची देखभाल करतात. या उपक्रमामध्ये औंध परिसरातील काही शाळांचाही समावेश करण्यात आला. पुढील वर्षीपासून ‘एक झाड एक शाळा’ उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व शाळांना या उपक्रमामध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना रोपांचे वाटपही करण्यात येणार आहे, अशी माहिती सराफ यांनी दिली. सराफ यांनी सुरू केलेल्या एसएमएस ग्रुपमधील मोनिका भोसले, दिलीप भोसले, पवन भोसले विविध सोसायटय़ांना भेट देऊन झाडांची देखभाल करतात. फक्त झाड लावणे म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही. तर, ते झाड जगविणे आणि त्याची जोपासना करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण केलेल्या झाडांचे व्यवस्थित संगोपन केले तर निसर्गाचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास सराफ यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2017 2:46 am