महापालिका प्रशासनाचे नियोजन ल्ल अधिकृत घोषणा आज
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन पंधरा टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. या नियोजनानुसार शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. या संबंधी महापालिकेतील पक्षनेत्यांची बैठक आज, गुरुवारी होण्याची शक्यता असून, या बैठकीनंतर पाणीकपातीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये आतापर्यंत निम्म्याहून कमी पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. या परिस्थितीचा विचार करून शहरात पंधरा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. मात्र, ही कपात केव्हापासून लागू करायची याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची बुधवारी चर्चा झाली. या चर्चेत बापट यांनी पाणीकपात करण्यास सहमती दर्शवली.
पाणीकपात व शहराचे पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक याबाबत महापालिकेतील पक्षनेत्यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना पाणीकपातीबाबत माहिती दिली जाईल. या बैठकीनंतर पाणीकपातीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल, असे आयुक्तांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाणीकपातीच्या काळात विविध प्रभागांमध्ये कशा प्रकारे पाणीपुरवठा करायचा व त्याच्या वेळा यांचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे. सध्या शहरातील काही भागांमध्ये दोन वेळा, तर उर्वरित भागांमध्ये एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. सप्टेंबर अखेपर्यंत एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल व त्यानंतर परिस्थितीचा विचार करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे लागेल, असे प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा आज बंद
पर्वती जलकेंद्र तसेच वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युतविषयक तसेच स्थापत्यविषयक अत्यावश्यक दुरुस्तीची कामे गुरुवारी (३ सप्टेंबर) केली जाणार असल्यामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (४ सप्टेंबर) सकाळचा पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.