हिंजवडी मधील एका २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीला एकतर्फी प्रेमप्रकरणातून गोळ्या घालण्याची धमकी तरुणाने दिली आहे. आरोपी तरुण देखील संगणक अभियंता असून ते एकाच कंपनीत काम करत होते. याप्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

जितेंद्र सोलंकी (सध्या रा. शोनेष्ट टॉवर सोसायटी, वाकड, मूळ रा.जोधपूर राजस्थान) असे संगणक अभियंता आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर धमकावणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र सोलंकी हा २४ वर्षीय संगणक अभियंता तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. ते दोघेही हिंजवडी मधील कॉग्निझन्ट या कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांची एका प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली. त्या दरम्यान त्यांची मैत्री झाली. मात्र त्यापुढे जाण्यास तरुणीचा विरोध होता. परंतु जितेंद्र हा तरुणीला वारंवार त्रास देत होता.

तरुणीने यासंबंधी कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर देखील जितेंद्र हा तरुणीला त्रास देत होता. त्याने तरुणीला प्रेम असल्याचे सांगितले. परंतु संबंधित तरुणीने त्याला नकार दिला. याचा राग जितेंद्रला अनावर झाला आणि फोनवरून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यानंतर स्वतःच जितेंद्रने कंपनी सोडली. परंतु, तरुणीला फोन आणि व्हाट्सऍपवर धमक्याचे मेसेज येत असल्याने तरुणीने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.