मुंबईतून पिंपरी-चिंचवड शहरात ब्राऊन शुगर (अंमली पदार्थ) विकण्यासाठी आलेल्या महिलेला अंमली पदार्थ आणि खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. संबंधित महिलेकडून तब्बल ३६ लाख रुपयांचे ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आलं आहे. कलाराणी पेरिसामी देवेंद्र (वय-५२) असं अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती मूळची तामिळनाडू येथील असून मुंबई मधील सायन कोळीवाडा येथे राहण्यास आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पथकातील पोलीस कर्मचारी हे गस्त घालत असताना शहराच्या कासारवाडी, नाशिक फाटा येथे ५२ वर्षीय महिला ही संशयितरित्या थांबली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार,दोन्ही पथकाने जाऊन कलाराणी पेरिसामी देवेंद्र या महिलेला अटक केली.तिच्याकडे ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर मिळाली ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठे ३६ लाख रुपये किंमत आहे. ब्राऊन शुगर ही परराज्यातून आणली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत आणि श्रीराम पौळ यांच्या मर्गदर्शनाखाली पोलीस उपरिक्षक वसंत मुळे, पुरुषोत्तम चाटे यांच्या पथकाने केली.अटक करण्यात आलेल्या महिलेच्या पाठीमागे मोठे रॅकेट तर नाही ना याचा शोध पोलीस घेत आहेत.