News Flash

हिरवा कोपरा : घरच्या घरी कांदा, गाजर, मुळा भाजी

कांदानवमीची कल्पना ज्याला सुचली त्याला सलाम! कांदा लावायला हा काळ अत्यंत योग्य आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

एखाद्या तिथीला भाजीच्या नावाने नावाजले जावे असे भाग्य लाभले आहे, तीक्ष्ण वासाच्या गंधकाच्या गुणधर्माने डोळय़ांत पाणी आणणाऱ्या तरीही सगळय़ांना आवडणाऱ्या कांद्याला. पावसाळय़ाच्या भटकंतीत टपरीवरची कांदा भजी हेच प्रमुख आकर्षण असते. कांदानवमीची कल्पना ज्याला सुचली त्याला सलाम! कांदा लावायला हा काळ अत्यंत योग्य आहे.

नाकाने कांदे सोलणाऱ्यांच्या माळेतला हा कंद कांदा. याला जमीन अल्कधर्मी हवी. प्रखर आणि भरपूर सूर्यप्रकाश हवा. जमिनीत फार ओल नको. नत्राचे प्रमाणही मोजकेच हवे आणि एवढे करूनही तब्येत तशी नाजूक-साजूक. त्यामुळे कीड पडण्याचा धोका जास्त. तरीही शेतकरी मोठय़ा प्रमाणात कांदा लावतात. कारण पंजाबी जेवण असो किंवा अस्सल कोल्हापुरी, कांदा ८० रुपये किलो झाला तरी अनेक घरांत कांद्याशिवाय पान हलत नाही. उन्हाळय़ात थंडाव्यासाठी पांढऱ्याशुभ्र कांद्याची माळ घरोघरी लागतेच. कांदा लावायला मात्र सोपा. आडव्या कुंडीत, क्रेटमध्ये अथवा गच्चीत दोन विटांच्या वाफ्यात माती, कोकोपिथ, नीमपेंडचे मिश्रण भरून तसेच ठेवावे. जेणेकरून जास्तीची ओल सूर्यप्रकाशाने कमी होईल. नंतर अगदी छोटे कांदे अथवा रोपवाटिकेतून आणलेली कांद्याची रोपं मातीत एक इंच आत खोचावीत. कांदे फार आत खोचू नयेत. दोन कांद्यातील अंतर साधारण १० ते १२ इंच ठेवावे. वाफ्यात लावल्यास दोन ओळींत ८ ते १० इंच अंतर ठेवून रोपांची लागवड करावी. रोपे जलद वाढतात. कांद्याची पाने म्हणजे पात तरारते. महिन्यातून एकदा एक मूठ बोनमिल अथवा स्टेरामिलचे गोल िरगण रोपाभोवती फिरवावे म्हणजे कांदे छान भरतील. तीन महिन्यांनंतर पात पिवळी पडू लागेल. ती हाताने नुसती आडवी करावी. नंतर दोन आठवडय़ांनी अलगद कांदे उपटावेत. कांद्याची शेती पातीसाठी करतात, तसेच बियांसाठीही करतात. पंजाबी पाककृतींमध्ये बियांचा भरपूर वापर होतो. कांद्याच्या पातीच्या मधून एक दांडा येऊन त्यास पांढुरक्या फुलांचा चेंडू येतो. फुलांची ही रचना फारच सुंदर दिसते. पुष्परचनेसाठीही वापरता येते. फुले सुकल्यावर त्यात त्रिकोणी आकाराच्या चविष्ट काळय़ा बिया तयार होतात. बियांपासूनही रोपे करता येतात, पण त्या लगेच वापरल्या तरच चांगली उगवण होते. कांद्याची शेती पातीसाठीही करतात. त्यामुळे आपल्याला घरातही फक्त पातीसाठी कांदा लावता येतो. चायनीज रेसिपी करताना थोडीशी कांदापात लागते. त्यासाठी गड्डी लागत नाही. घरात शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये कोंब आलेले कांदे किंवा त्यांच्या कोंबाच्या भागाची चकती लावली तरी पात छान येते.

कांदा जमिनीतून काढल्यावर न धुता वाळवावा लागतो. लसूण धुऊन वाळवला तरी चालतो. पण कांदा धुतल्यास स्वादही जातो आणि खराबही होतो. होमिओपॅथीमध्ये औषध म्हणून कांद्याचा वापर होतो. कांद्यावर कीड पडण्याचा, लांब लांब दोऱ्यासारखी बुरशी येण्याचा धोका असतो. त्यासाठी १५ दिवसांनी एकदा नीमपेंड भुरभुरावी अथवा िलबोणीच्या तेलाचे पाण्यामध्ये मिश्रण करून ते फवारावे. झाडातील सहजीवन एकमेकास पूरक ठरते. कांद्याबरोबर गाजराची लागवड केल्यास कांद्याचे संरक्षण होते. गाजराच्या बियांपासून रोपे तयार करावीत. शेती उद्योग मंडळाकडे गाजराचे बी उपलब्ध असते. हे पाकीट मोठे असल्यामुळे दोन-तीन जणांनी वाटून घ्यावे. पाकीट घेताना तारीख बघून घ्यावी. फार जुन्या बियांची उगवणक्षमता कमी झालेली असते. छोटय़ा आडव्या कुंडीत अथवा क्रेटमध्ये माती आणि नीमपेंडचे मिश्रण मिसळून सहा ते आठ इंच अंतरावर रोपे लावावीत. तीन महिन्यांत गाजरे छान वाढतात. गाजराची कातरलेली हिरवी पाने फार सुंदर दिसतात. त्यामुळे कुंडीही आकर्षक दिसते. गाजरे लावण्याचे काम मुलांकडे सोपवावे. नंतर ताजी गाजरे उपटून खाण्याची मजा औरच असते. पूर्वी हलक्या गुलाबी रंगाची, वरती जाड आणि खाली शेपटीसारखी निमुळती होणारी अतिशय मधुर गाजरे मिळत. आता जाड, बेचव, केशरी अथवा रंगात बुडवलेली गर्द गुलाबी गाजरे मिळतात. पण गावरान गाजराचे बी लावल्यास घरात मधुर गाजरे मिळतील.  पाने आणि कंद या दोन्हींचा उपयोग होणारी आणखी एक लोकप्रिय भाजी म्हणजे मुळा. खोल आडव्या कुंडीत अथवा क्रेटमध्ये माती, कोकोपिथ, नीमपेंड भरून त्यामध्ये सहा इंचावर मुळय़ाच्या बिया खोचाव्यात. पांढऱ्या आणि लाल मुळय़ाच्या बिया शेती उद्योग महामंडळात उपलब्ध असतात. महिन्याभरात मुळय़ाची पाने तरारतील. त्यास पुन्हा एकदा दोन मुठी कंपोस्टचा डोस द्यावा. कोवळय़ा पानांचा वापर सॅलड, कोिशबीर, भाजी, पराठे वा थालिपीठासाठी करता येतो. तीन महिन्यांनी ताजे करकरीत मुळे तयार होतील. मुळय़ाच्या पानाच्या उग्र वासाने इतर झाडांचे किडींपासून रक्षण होते.  कांदा, गाजर आणि मुळा हे घरच्या घरी सहज लावणे शक्य आहे. कुंडय़ा आणायच्या. त्यात पालापाचोळा आणि ओला कचरा भरायचा अन् त्याची माती झाली की बी रुजवायचे. शहरातील कचऱ्यावर मात करण्याचा, ओल्या कचऱ्याचा संसाधन म्हणून उपयोग करण्याचा, नवनिर्मितीचा आनंद घेण्याचा शाश्वत मार्ग म्हणजे ही शहरी शेती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:44 am

Web Title: onion carrot radish vegetable made in home garden
Next Stories
1 राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या कार्यालयाची राष्ट्रवादीकडून तोडफोड
2 देशातील विद्यापीठांना ‘वर्ल्ड क्लास’ बनण्याची संधी
3 मोशी-चऱ्होली आकारानुसार सर्वात मोठा प्रभाग
Just Now!
X