अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काढणीस आलेला नवीन कांदा भिजल्याने खराब झाला असून जुन्या कांद्याचा साठादेखील संपत आल्याने कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास डिसेंबर उजाडणार असून तोपर्यंत सामान्यांना कांदा दरवाढीचे चटके सोसावे लागणार आहेत.

मोसमी पाऊस माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्र तसेच कर्नाटकात अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. काढणीस आलेला कांदा खराब झाला असून जुन्या कांद्याला जादा दर मिळत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या दोन्ही राज्यात झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याची आवक जवळपास थांबली असल्याचे पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. इतर महानगरांतही कांद्याची हीच परिस्थिती आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून नवीन कांद्याची (हळवी) बाजारात आवक सुरू होते. सातारा जिल्ह्य़ातील लोणंद, फलटण, नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा भागातून कांद्याची आवक होते. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. काही भागात शेतात साठलेले पाणी निघण्यास आणखी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. जुन्या कांद्याची (गरवी) आवक संगमनेर, शिरुर, मंचर, जुन्नर भागातून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बाजारात सुरू होती. मात्र, जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने  कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली, असे त्यांनी नमूद केले.

दिल्लीतही दरवाढ  

नवी दिल्ली : दिल्लीतही कांद्याचे भाव दुपटीने वाढले असून गेल्या आठवडय़ात ४५ रुपयांनी विकला जाणारा कांदा आता ८० रुपयांवर गेला आहे. सरकारने अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्कस्तान आणि इराण येथून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

फक्त १० ते १५ टक्के कांद्याची प्रतवारी चांगली

महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये कांद्याचा मोठा बाजार आहे. तेथील घाऊक  बाजारात दररोज ५०० ते ६०० ट्रक नवीन कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. बंगळुरूतील बाजारपेठेत होणारी आवक मोठी असली तरी एकूण आवकेच्या फक्त १० ते १५ टक्के कांद्याची प्रतवारी चांगली आहे. उर्वरित कांदा अवेळी झालेल्या पावसामुळे खराब झाला असल्याचे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.