करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर राज्यातील विविध भागातील बाजार समित्या ५० दिवस बंद होत्या. शेतीमाल साठवणुकीस जागा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बांधावरूनच शेतीमालाची विक्री केली. बाजार समित्या बंद असल्याने कांद्याची साठवणूक कशी करायची, असा प्रश्न शेतक ऱ्यांपुढे होता. अवेळी पावसाचे संकट असल्याने कांदा खराब होण्याचीही शक्यता होती. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी थेट बांधावरच शेतक ऱ्यांकडून कांदा खरेदी केली आणि तो दक्षिणेकडील राज्यात विक्रीसाठी पाठविला. या व्यवहारांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना  दिलासा मिळाला.

राज्यातील बाजार समित्या बंद असताना पुणे, मुंबईतील बाजार आवारात कांदा तसेच शेतीमाल कसा पोचवयाचा, हा देखील प्रश्न होता. अशा परिस्थितीत कांदा शेतात पडून होता. अवेळी पाऊस झाल्यास कांदा खराब होण्याची शक्यता होती. अनेक शेतक ऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने ते अडचणीत आले होते. पुणे विभागातील कांद्याला दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातून मोठी मागणी असते. व्यापाऱ्यांनी थेट बांधावरच खरेदी व्यवहार केला. शेतक ऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला कांदा दक्षिणेकडील राज्यात काही दिवसांपूर्वी पाठविण्यात आला, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पुणे जिल्ह्य़ातील  दौंड, आंबेगाव,जुन्नर, खेड, हवेली तालुक्याच्या काही भागात कांदा लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. बाजार समित्या बंद असल्याने शेतक ऱ्यांपुढे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.

शेतक ऱ्यांनी बांधावरच कांदा विक्री व्यवहाराला प्राधान्य दिले. पुणे आणि अहमदनगर भागातील शेतक ऱ्यांकडून पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा खरेदी केला. भाजप-सेना युती सरकारच्या काळात शेतीमाल नियमनमुक्त करण्यात आल्याने विक्री व्यवहारात फारशी अडचण आली नाही. गरवी कांद्याचा (गावरान कांदा) हंगाम सुरू असताना टाळेबंदी जाहीर झाली होती.

कांदा दरातही घसरण

सहा महिन्यांपूर्वी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. कांदा शेतात भिजल्यामुळे नवीन कांद्याची आवक झाली नाही. त्यामुळे जुन्या कांदाच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर प्रतवारीनुसार १०० ते १६० रुपयांपर्यंत जाऊन पोचला, त्या वेळी परदेशातील कांदा मागविण्यात आला. परदेशातील कांद्याची प्रतवारी तितकीशी चांगली नव्हती. दहा दिवसांपूर्वी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज नियमित सुरू झाले. पुण्यातील मार्केटयार्डातील कांदा-बटाटा विभागात कांद्याची आवक सुरू झाली. शंभर किलो कांद्याचा पोत्याचा दर सध्या प्रतवारीनुसार ७०० ते ८०० रुपये आहे. घाऊक बाजारात एक किलो कांद्याला ६ ते ८ रूपये असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात कांदा स्वस्त झाला असून प्रतवारीनुसार १५ ते २० रुपये दराने एक किलो कांद्याची विक्री करण्यात येत आहे.