कांद्यांच्या दरात घसरण सुरू; घाऊक आणि किरकोळ बाजारात काद्याची मोठी आवक

चार ते पाच महिन्यांपूर्वी बाजारात ‘भाव ’ खाणाऱ्या कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. निर्यातबंदी उठविल्याबरोबरच शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविला. परिणामी घाऊक तसेच किरकोळ बाजारात कांद्याची मोठी आवक झाली. व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी कांदा खरेदी करण्याचे थांबविले. सध्या बाजारात कांदा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असून घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर ७५ ते ८५ रुपये आहेत. किरकोळ बाजारातही कांद्याचे दर उतरले आहेत. दक्षिण तसेच उत्तर भारतातील राज्यांकडून मागणी कमी झाल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे.

कांद्याच्या दरात घसरण झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी चिंतातूर आहेत. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात रविवारी (११ मार्च) १७५ ट्रक कांद्याची आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलो कांद्यास ७० ते ९० रुपये असे दर मिळाले.

निर्यातीवरील बंधने हटविण्यापूर्वी कांद्याचे प्रतिकिलोचे भाव १४ ते १५ रुपयांपर्यंत होते. निर्यातीवरील बंधने उठविल्यानंतर कांद्याचे दर २० रुपयांपर्यंत  पोहोचले होते. त्यावेळी  परराज्यातून कांद्याला मागणी चांगली होती. निर्यातीवरील बंधने उठविल्यानंतर कांद्याच्या मागणीत घट होत चालली आहे. गेल्या आठवडय़ात घाऊक बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे दर १२ रुपये होते.

यासंदर्भातील मार्केटयार्डातील कांद्याचे व्यापारी विलास रायकर म्हणाले, चार ते पाच महिन्यांपूर्वी कांद्याचे दर तेजीत होते. कांदा तेजीत असताना शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा लागवड केली. महाराष्ट्रातील अनेक भागांत कांद्याचे मोठे पीक घेतले जाते. मात्र, यंदा कांद्याला चांगले दर मिळाल्याने परराज्यातील  शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांद्याची लागवड केली. पोषक हवामानामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले.

त्यानंतर बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आला. दक्षिणेकडील तसेच उत्तरेकडील राज्यातून कांदा खरेदी होत असल्याने कांद्याचे दर बरे होते. चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात दहा किलो कांद्याची विक्री ३५० ते ४५० रुपये या दराने होत होती. आता घाऊक बाजारात कांद्याला ७५ ते ८५ रुपये असा भाव मिळाला आहे.

उत्तरेकडील राज्यातून मागणी घटली

परराज्यातून कांद्याची मागणी कमी झाली आहे. मध्यंतरी पंजाब, दिल्ली, हरियाणा भाागातून कांद्याला मागणी होती.  उत्तरेकडील राज्यात गुजरात आणि राजस्थानातून कांदा विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत घट होऊनही दरात घसरण सुरू झाली आहे, असे कांद्याचे व्यापारी विलास रायकर यांनी सांगितले.