19 January 2020

News Flash

पोह्य़ात कांद्याऐवजी बटाटा!

घाऊक बाजारात कांद्यांचे दर शंभर रुपये किलोच्या वर गेले आहेत.

महागाईमुळे मिसळही कांद्याविना; हॉटेल व्यावसायिक हतबल

घरच्या घरी किंवा हॉटेलमध्ये झटपट होणारे, तरीही पौष्टिक आणि पोटभरीचे कांदेपोहे अनेकांसाठी आवडीचा नाश्ता असतो. मात्र कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सध्या कांदेपोह्य़ांत कांदा घालताना हॉटेल व्यावसायिकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. यावर शक्कल म्हणून हॉटेल्सच्या मेनूकार्डमधील कांदेपोह्य़ांची जागा बटाटा पोह्य़ांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे कांद्याशी घट्ट नाते असलेली मिसळही सध्या कांद्याविना आहे.

घाऊक बाजारात कांद्यांचे दर शंभर रुपये किलोच्या वर गेले आहेत. त्यामुळे पोहे, मिसळ, पाव-भाजी, दडपे पोहे, भेळ अशा पदार्थामध्ये कांदा घालताना हॉटेल व्यावसायिकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. ग्राहकांना भरपूर कांदा द्यावा तर खिशाला फोडणी, न द्यावा तर ग्राहक दुरावण्याची भीती अशा दुहेरी संकटात हॉटेल व्यावसायिक सापडले आहेत. त्यामुळे कांदेपोह्य़ांऐवजी बटाटा पोहे, मिसळ आणि पावभाजी बरोबर बारीक चिरलेल्या कांद्याऐवजी काकडी, गाजर असे त्यातल्या त्यात खिशाला परवडणारे पर्याय निवडण्यात येत आहेत.

फक्कड फूड्सचे अंबर कर्वे म्हणाले,की हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्यानंतर दहा ते बारा रुपये किलो पासून कांदा खरेदी करत आलो आहे, आज कांद्याने शंभरी ओलांडली आहे. एक किलो कांद्याची किंमत एक डॉलरपेक्षाही वाढली आहे. ‘फक्कड’मध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आम्ही ग्राहकांसाठी बनवतो. कांदेपोह्य़ांसाठी कांदा वापरणे खरोखरच परवडत नसल्यामुळे कांद्याचे दर आवाक्यात येईपर्यंत मेनूकार्डमध्ये बटाटा पोहे हा बदल केला आहे. मिसळ बरोबर कांदा देणे भाग असल्यामुळे तिथे कोणतीही तडजोड अद्याप केलेली नाही.  दडपे पोहे ही देखील आमची खासियत आहे, त्यासाठी सुद्धा कांदा भरपूर वापरावा लागतो. मात्र, वाढीव दरांमुळे जमाखर्चाचा ताळमेळ साधताना दमछाक होत आहे.

साईछाया मिसळ हाऊसचे मंगेश काळे म्हणाले,की मिसळ आणि बारीक चिरलेला भरपूर कांदा हे खवय्यांचे आवडते समीकरण आहे. कांद्याचे पैसे आकारायचे तर ग्राहक दुरावतील ही भीती आहे, कांदा न देणे व्यावसायिक तत्त्वांमध्ये बसत नाही. ही तारेवरची कसरत साधताना खिसा हलका होत आहे. अनेक ठिकाणी, पावभाजी किंवा जेवणाबरोबर दिल्या जाणाऱ्या कांद्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी गाजर, काकडी, मुळा दिला जात आहे. मात्र, सर्वच भाज्या महाग झाल्याने त्यांचे दर आवाक्यात येऊन हॉटेल व्यावसायिकांना अच्छे दिन कधी येतात याचीच प्रतीक्षा आहे.

परदेशी कांदा सपक!

अंबर कर्वे म्हणाले, ‘कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सध्या तुर्कस्तानचा कांदा  बाजारपेठेत दाखल झाला आहे. तुर्कस्तानच्या कांद्यामुळे खिशाला दिलासा मिळणार असला तरी खवय्यांना त्यातून अपेक्षित चव मिळण्याची शक्यता नाही. मी यापूर्वी इजिप्तचा कांदा देखील वापरून पाहिला आहे, मात्र भारतीय किंवा मराठी खवय्यांच्या जिभेला रूचेल असा स्वाद त्यातून मिळत नाही, त्यामुळे पदार्थ बेचव वाटतात.’

First Published on December 5, 2019 1:10 am

Web Title: onion potato in poha akp 94
Next Stories
1 नव्या वर्षांत पुण्यात ‘आधार’साठी सेवा केंद्र
2 रात्री झोपण्याआधी गॅस सिलेंडर बंद आहे की नाही तपासता का? नसेल तर ही बातमी वाचाच
3 पुणे- स्केटिंग प्रशिक्षकाची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेहाशेजारी आढळल्या बिअरच्या बाटल्या
Just Now!
X