पंधरवडय़ापूर्वी किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे प्रतिकिलो दर पन्नास रुपयांच्या पुढे गेले असताना जुन्या कांद्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पावसाने उघडीप दिल्याने नवीन कांद्याची नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा तसेच सातारा जिल्ह्य़ातील लोणंद भागातून आवक सुरू झाली आहे. नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांदा दरातील वाढ थांबली आहे.

महिनाभरापूर्वी महाराष्ट्र तसेच कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम तर  लांबणीवर पडला आहे. मुसळधार पावसामुळे शेतात नवीन कांद्याची रोपे वाहून गेली होती. त्यामुळे साठवणूक करण्यात आलेल्या जुन्या कांद्याच्या मागणीत वाढ झाली आणि घाऊक, किरकोळ बाजारात जुन्या कांद्याच्या दरात वाढ झाली होती.

साठवणूक करण्यात आलेल्या जुन्या कांद्याला मागणी वाढली होती. दरम्यान, केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीस बंदी घातली. निर्यातबंदीमुळे जुन्या कांद्याचे दर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, जुन्या कांद्याला मागणी वाढल्याने दर तेजीत होते, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

महाराष्ट्रापाठोपाठ दक्षिणेतील कर्नाटकात कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नवीन कांद्याची आवक सुरू झाली. कर्नाटकातील स्थानिक बाजारात तेथील कांद्याची आवक सुरू झाली. त्यामुळे कर्नाटकातून असलेली  महाराष्ट्रातील जुन्या कांद्याच्या मागणीत घट  झाली, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा आणि सातारा जिल्ह्य़ातील लोणंद परिसरातून मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दररोज  एक ट्रक नवीन कांद्याची आवक होत आहे. जुन्या कांद्याची आवक दररोज २५ ते ३० ट्रक एवढी होत आहे, असे त्यांनी सांगितले.

जुन्या कांद्याला मागणी

दहा किलो नवीन कांद्याला  घाऊक बाजारात १५० ते २०० रुपये असे दर मिळाले आहेत.  किरकोळ  बाजारात प्रतवारीनुसार नवीन कांद्याची विक्री १५ ते २५ रुपये या दराने केली जात आहे. चांगल्या प्रतीच्या  जुन्या कांद्याला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार ३७० ते ४०० रुपये आणि ३२० ते ३७० रुपये असे दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो जुन्या कांद्याची विक्री ४० ते ५० रुपये या दराने केली जात आहे. शहरातील उपाहारगृह चालकांकडून जुन्या कांद्याला मागणी आहे.