जुन्या कांद्याचा साठा संपला; अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याची आवक कमी

अवेळी झालेल्या पावसामुळे  शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा सर्वाधिक फटका नवीन कांद्याच्या उत्पादनाला बसला आहे.  नवीन कांदा शेतात भिजल्याने त्याची आवक कमी झाली आहे. त्यातच जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने राज्याच्या बहुतांश भागात घाऊक आणि किरकोळ बाजारात  मंगळवारी उच्चांकी दर मिळाले. शंभरी पार केलेल्या जुन्या कांद्याला किरकोळ बाजारात प्रतिकिलो दीडशे रुपये आणि नवीन कांद्याला शंभर रुपये असा दर मिळाला.

नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असला तरी अवेळी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक अपुरी पडत असल्याने मंगळवारी घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला १३०० रुपये असा दर मिळाला. घाऊक बाजारात दहा किलो नवीन कांद्याला  एक हजार रुपये दर मिळाला आहे. पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात मंगळवारी (३ डिसेंबर ) जुन्या आणि नवीन कांद्याच्या एकूण मिळून तीस ते चाळीस गाडय़ांची आवक झाली. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असली तरी कांद्याची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. मात्र, कांद्याची एकूण आवक अपुरी पडत असल्याने नवीन कांद्याचे दर तेजीत असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांदा व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

ते म्हणाले, जुन्या कांद्याचा हंगाम संपत आला आहे. नवीन कांद्याच्या तुलनेत जुन्या कांद्याची प्रतवारी चांगली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात कांद्याचे दर तेजीत आहेत. नवीन कांद्याची आवक  साधारपणपणे दीड महिना  सुरू राहील. त्यानंतर पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात जुन्या कांद्याचा हंगाम सुरू  होईल.

कांद्याचे क्विंटलचे दर

  •  जुना कांदा प्रतिक्विंटल १३ हजार रुपये
  •  नवीन कांदा प्रतिक्विंटल १०  हजार रुपये

परदेशी कांद्याला टिकवण क्षमता नाही :- तुर्कस्थान, इजिप्त या देशांमधील कांदा घाऊक बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. नवीन कांद्याप्रमाणे परदेशी कांदा ओलसर आहे. त्यामुळे परदेशी कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याचे निरीक्षण कांदा व्यापाऱ्यांनी नोंदविले.

मार्केट यार्डात एक किलो नवीन कांद्याची ८० ते ९० रुपये तसेच जुन्या कांद्याची खरेदी ११० ते १३० रुपये या दराने खरेदी करण्यात आली. कांदा खरेदीवर आकारण्यात येणारी आडत विचारात घेता किरकोळ व्यापाऱ्यांनी नवीन कांद्याची विक्री प्रतिकिलो १०० रुपये दराने सुरु केली आहे. जुन्या कांद्याची विक्री १५० ते १६० रुपये दराने करण्यात येत आहे. पुढील एक महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहतील. नवीन कांदा ओलसर आहे. त्याची प्रतवारी चांगली नाही. नवीन कांद्याचे एक पोती खरेदी केल्यानंतर त्यात साधारणपणे पाच ते सहा किलो कांदा खराब निघतो. दोन वर्षांपूर्वी कांद्याला ८० रुपये किलो असा उच्चांकी दर मिळाला होता.

– प्रकाश ढमढेरे, किरकोळ बाजार, भाजीपाला विक्रेते