01 March 2021

News Flash

कांदा दर घटण्याची शक्यता

निर्यातबंदी आणि आयातीचा परिणाम; इराणमधील कांदा मुंबईत

(संग्रहित छायाचित्र)

कांद्याच्या दरवाढीने डोळ्यांत पाणी आणल्याने त्याच्यावरील निर्यातबंदीपाठोपाठ आता आयातही सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांकडील कांद्याचे दर कोसळण्याची शक्यता आहे. त्यात इराणमधील कांदा मुंबईतील बंदरावर दाखलही झाला आहे.

लांबलेल्या पावसामुळे कांद्याची आयात घटली आणि दरवाढ झाली. त्यामुळे त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयापाठोपाठ आता कांद्याची आयात सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी आणि आयातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडील उपलब्ध कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज आहे.

तीन ते चार दिवसांत कांदा दरात घट झाल्याचे दिसत आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला प्रतिकिलो ८५ रुपये असे दर काही दिवसांपूर्वी मिळाले होते. घाऊक बाजारात गेल्या तीन ते चार दिवसांत कांदा दरात २० रुपयांनी घट झाली असून जुन्या कांद्याला ६५ रुपये असे दर मिळाले आहेत.

आता केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. कांदा दरातील वाढ विचारात घेऊन आता इराणमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मध्य प्रदेशातूनही नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा परिसरातून नवीन कांदा येत आहे. स्थानिक कांदा भिजलेला असला तरी मध्य प्रदेशातील कांद्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील नवीन कांद्याची प्रतवारी चांगली आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा किलो कांद्याला ५५० ते ६५० रुपये दर मिळाले आहेत. मध्य प्रदेशातील दहा किलो कांद्याला ३०० ते ४०० रुपये दर मिळाले आहेत. महाराष्ट्रातील नवीन कांद्याला १५० ते ३०० रुपये असे दर मिळालेले आहेत. परदेशातील कांदा  मोठय़ा  प्रमाणावर दाखल झाल्यास  दर कमी होण्याचा अंदाज आहे.

मुंबईत कांद्याचे घाऊक  दर ६० ते ७० रुपये

कांद्याचा दर १०० रुपयांच्या घरात पोहोचल्याने त्याच्या आयातीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून घाऊक बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांवर स्थिर आहेत. सोमवारी बाजारात इराण आणि इजिप्त येथील कांद्याच्या तीन गाडय़ा दाखल झाल्या. त्याचबरोबर राज्यातूनही ८६ गाडय़ा कांदा आला. घाऊक बाजारात जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. परदेशी आणि नवीन कांद्याचे दर ४०-५०रुपये, तर जुना कांदा ६० ते ७० रुपये किलो आहे.

इराणमधील कांद्यापेक्षा महाराष्ट्रातील कांद्याची प्रतवारी चांगली आहे. इराणमधील कांदा स्वस्तात मिळेल. त्याला उपाहारगृहचालक आणि खाणावळचालकांकडून मागणी असेल. महिन्याभरात महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात घट होईल.

– रितेश पोमण, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:44 am

Web Title: onion rates likely to fall abn 97
Next Stories
1 दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत अनिश्चितता
2 ‘सेट’ परीक्षा २७ डिसेंबरला
3 करोना रुग्ण बरे होण्याचा दर पुण्यात देशात सर्वाधिक
Just Now!
X