19 November 2019

News Flash

कांदा दरवाढीचे डिसेंबपर्यंत चटके

नोव्हेंबर महिन्यापासून नवीन कांद्याची (हळवी) बाजारात आवक सुरू होते.

(संग्रहित छायाचित्र)

 

अवेळी पावसामुळे नवीन कांदा खराब :- अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काढणीस आलेला नवीन कांदा भिजल्याने खराब झाला असून जुन्या कांद्याचा साठादेखील संपत आल्याने कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. नवीन कांद्याची आवक सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार असून तोपर्यंत सामान्यांना कांदा दरवाढीचे चटके सोसावे लागणार आहेत.

मॉन्सून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्र तसेच कर्नाटकात अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. काढणीस आलेला कांदा खराब झाला असून जुन्या कांद्याला जादा दर मिळत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या दोन्ही राज्यात झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याची आवक जवळपास थांबली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यापासून नवीन कांद्याची (हळवी) बाजारात आवक सुरू होते. सातारा जिल्ह्य़ातील लोणंद, फलटण, नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा भागातून कांद्याची आवक होते. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. काही भागात शेतात साठलेले पाणी निघण्यास आणखी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. जुन्या कांद्याची (गरवी) आवक संगमनेर, शिरुर, मंचर, जुन्नर भागातून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बाजारात सुरू होती. मात्र, जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली, असे त्यांनी नमूद केले.

मार्केटयार्डातील घाऊक बाजारात बुधवारी ८० ट्रक कांद्याची आवक झाली. दहा किलो कांद्याला ४५० ते ५२० रुपये असे दर मिळाले. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने केली जात असून आणखी महिनाभर कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचे पोमण यांनी सांगितले.

फक्त १० ते १५ टक्के कांद्याची प्रतवारी चांगली

महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकात कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये कांद्याचा मोठा बाजार आहे. तेथील घाऊक  बाजारात दररोज ५०० ते ६०० ट्रक नवीन कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. बंगळुरूतील बाजारपेठेत होणारी आवक मोठी असली तरी एकूण आवकेपैकी फक्त १० ते १५ टक्के कांद्याची प्रतवारी चांगली आहे. उर्वरित कांदा अवेळी झालेल्या पावसामुळे खराब झाला असल्याचे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

First Published on November 7, 2019 1:41 am

Web Title: onion rates new onion akp 94
Just Now!
X