ग्राहक आयोगाकडून सुनावणीसाठी ऑनलाइन अ‍ॅप

पुणे : एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यात काही दोष आढळल्यास तसेच सदोष सेवा दिल्याबद्दल दाद मागणाऱ्या  ग्राहकांना ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या माध्यमातून न्याय मिळतो. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंचाचे काम गेले दोन महिने ठप्प झाले होते. फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येत होती. ग्राहक मंचात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहक मंचाकडून ‘कन्झ्युमर कनेक्ट’आणि ‘गो टू मिटींग’ हे अ‍ॅप विकसित केले आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारदार ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे ग्राहक मंचात दाखल करता येणे शक्य होईल. यामुळे ग्राहकांना घरबसल्या न्याय मिळणे शक्य झाले आहे. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांना ग्राहक मंचाच्या माध्यमातून न्याय मिळवणे अवघड झाले होते. ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल झालेल्या प्रकरणांना पुढील तारखा देण्यात येत होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गेल्या सोमवारपासून (८ जून) ग्राहक मंचाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. राज्य सरकारकडून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेले कन्झुमर कनेक्ट अ‍ॅप हे मुंबईतील न्यायमंचापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते.

मुंबईपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम आता राज्यातील अन्य ग्राहक मंचात देखील राबविण्यात येणार आहे. कन्झ्युमर कनेक्ट अ‍ॅपद्वारे ग्राहकांना तक्रारींची स्कॅन कागदपत्रे घरी बसून अपलोड करता येणार आहेत.   सुनावणी घ्यायची झाल्यास वकील आणि पक्षकारांकडून मंचाला तारीख कळविण्यात येईल. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंच ठरावीक तारखेला उपलब्ध होईल. प्रत्यक्ष सुनावणीसाठी वकील, पक्षकार आणि  बचाव पक्षाला हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

गो टू मिटींग अ‍ॅपद्वारे कॅमेऱ्यापुढे पक्षकारांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. कन्झ्युमर कनेक्ट अ‍ॅपमध्ये प्रकरणासाठी दिलेल्या क्रमांकाची लिंक गो टू मिटींगद्वारे पाठविण्यात येईल. हे लिंक कार्यान्वित केल्यानंतर सुनावणी सुरू होईल. प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी पक्षकार ग्राहक, वकील आणि प्रतिवादी गो टू मिटींगद्वारे ग्राहक मंचाच्या अध्यक्षांसमोर हजर राहतील. त्या वेळी प्रकरणाची माहिती पक्षकार आणि वकिलांकडून मंचाला सांगण्यात येईल. सुनावणी होणारी कागदपत्रे स्कॅन करण्यात आली असल्याने ती कागदपत्रे ग्राहक मंचातील अध्यक्ष आणि सदस्यांना मोबाइल किंवा संगणकावरुन घरबसल्या पाहता येतील. ऑनलाइन सुविधेमुळे जलदगतीने सुनावणी पार पडेल.

अशी असेल प्रक्रिया

प्ले स्टोअरवर कन्झ्युमर कनेक्ट, गो टू मिटींग हे दोन्ही अ‍ॅप नि:शुल्क उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकांना स्वत:ची माहिती भरावी लागेल. कागदपत्रे स्कॅन करून ती जमा करावी लागतील. गो टू मिटींग अ‍ॅपद्वारे तक्रारदाराला सुनावणीसाठी हजर राहता येईल. त्यासाठी तक्रारदाराला न्यायमंचाकडून लिंक पाठविण्यात येईल. लिंक कार्यान्वित केल्यास गो टू मिटींग अ‍ॅपद्वारे तक्रारदार ग्राहक, वकील आणि प्रतिवादी सुनावणीसाठी हजर होतील.

राज्य ग्राहक आयोगाकडून आठवडभरात वकील आणि पक्षकारांना ऑनलाइन तक्रारीबाबतची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ज्यांचे प्रकरण ऑनलाइन पद्धतीने जमा झालेले आहे, त्यांना तत्काळ सुनावणी हवी असल्यास ऑनलाइन करता येणे शक्य होईल. राज्य ग्राहक आयोगाकडून पुढील आठ दिवसांच्या तारखा देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून (१५ जून) राज्य आयोगाचे ऑनलाइन  कामकाज नियमित सुरू झाले आहे.

उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच