‘‘हॅलो, मी बँकेचा प्रतिनिधी बोलतोय.. तुमचे क्रेडिट कार्ड अपग्रेट करायचे आहे. या प्रक्रियेनंतर तुम्हाला विविध गोष्टींमध्ये सवलत मिळेल.. वेगवेगळ्या योजनात सहभाग नोंदविता येईल. त्यामुळे कृपया आपल्या कार्डचा क्रमांक सांगा.’’.. साधारणत: अशाच प्रकारच्या संभाषणाचा दूरध्वनी येतो.. समोरील व्यक्ती अत्यंत गोड बोलून विश्वास संपादन करते.. त्यावर विश्वास टाकून क्रमांक व इतर माहिती सांगितली जाते. पण, थोडय़ाच वेळात आपल्या खात्यातून काही रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेतली जाते. मागील काही महिन्यांपासून शहरामध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीच्या विविध घटना घडत आहेत.
फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. त्यातील एका प्रकरणात स्वप्नील धोंगडे या पाषाण येथील तरुणाने फिर्याद दिली होती. एका नामांकित बँकेचा प्रतिनिधी बोलतो आहे, असे सांगून स्वप्नीलला अज्ञान व्यक्तीने फोन केला. त्यालाही काही योजनांची भुरळ घातली व गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर त्याच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने पाच हजार रुपये काढले. याच कालावधीत दूरध्वनीवर अशाच प्रकारचे संभाषण करून इतर पाच जणांची फसवणूक करण्यात आली. दुसऱ्या एका प्रकरणात एका तरुणीने दूरध्वनी करून क्रेडिट कार्ड अपग्रेट करायचे असल्याचे सांगितले. कार्ड अपग्रेट केल्यास प्रत्येक खरेदीवर पाच टक्के कॅशबॅक व पेट्रोल पंपावर जादा शुल्क द्यावे लागणार नसल्याची थापही तिने मारली. कार्डाबाबत प्रक्रिया करण्यासाठी संबंधिताच्या घरी तिने एका तरुणालाही पाठविले. त्यानेही अगदी गोड बोलून क्रेडिट कार्ड ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर काही वेळातच संबंधिताच्या खात्यातून तब्बल एक लाख २२ हजार रुपये काढून घेण्यात आले.
शहरात घडत असलेल्या या गुन्ह्य़ांबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, त्यापूर्वी नागरिकांनीही या प्रकारांबाबत सजगता बाळगणे गरजेचे असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त होत आहे. क्रेडिट कार्ड किंवा बँकेशी संबंधित इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपल्याबाबत आधीच थोडीफार माहिती काढलेली असते. ती माहिती त्याने दिल्यानंतर आपला संबंधित व्यक्तीवर विश्वास बसतो. मात्र, बँकेशी संबंधित अशी कोणतीही गोपनीय माहिती दूरध्वनीवर देणे टाळावे. आवश्यकता भासल्यास संबंधित बँकेशी संपर्क करून खात्री करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.