22 July 2019

News Flash

ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम

वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांची फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून गुन्हे

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांची फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

येरवडा भागातील एका पन्नास वर्षीय महिलेला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून ३३ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने लॉटरी लागल्याचे आमिष तिला दाखविले होते. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्याची सूचना करण्यात आली होती. महिलेने वेळोवेळी ३३ हजार रुपये बँक खात्यात जमा केले होते. महिलेने अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम तपास करत आहेत.

संकेतस्थळ विक्री करण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अकिल पटेल (वय ३७, रा. कडनगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल यांच्या मोबाइलवर संपर्क साधून एकाने संकेतस्थळ विक्रीचे आमिष दाखविले होते. त्यानंतर पटेल यांना अज्ञाताने पेटीएममध्ये १२ हजार रुपये भरण्यास सांगितले. पटेल यांनी पैसे जमा केले, मात्र कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यात आला नाही.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील तपास करत आहेत.

दरम्यान, एका महिलेला बक्षीस देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

एका योजनेत विजेत्या ठरल्याचे आमिष अज्ञाताने दाखविले होते. महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला बक्षिसापोटी दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, फ्रीज देण्याचे आमिष दाखवून तिला पेटीएममध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. महिलेकडून ४१ हजार ९८७ रुपये उकळण्यात आले, मात्र तिला बक्षीस देण्यात आले नाही. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

डेबीट कार्डची गोपनीय माहिती चोरून गंडा

एका युवतीच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती चोरून तिच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. युवतीने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवतीच्या डेबिट कार्डची माहिती चोरुन लष्कर भागातील एका बँकेतून बनावट डेबिट कार्डचा वापर करुन खात्यातून रोकड काढण्यात आली.

First Published on March 14, 2019 12:51 am

Web Title: online cheating session persists