News Flash

ऑनलाइन शिक्षणाचा शिक्षकांवर ताण!

तांत्रिक अडथळ्यांमुळे शिक्षकांना मानसिक ताण

ऑनलाइन शिक्षणाचा शिक्षकांवर ताण!
(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षकांना ताणाला सामोरे जावे लागत आहे. कामाचा वाढलेला वेळ, सतत ऑनलाइन राहावे लागणे, तांत्रिक अडथळ्यांमुळे शिक्षकांना मानसिक ताण सहन करावा लागत आहे.

करोना संसर्गामुळे यंदा शाळा सुरू  होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांच्या गटांना शिकवत आहेत. तर शहरी भागात पूर्वप्राथमिक, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ध्वनिचित्रफिती तयार करून यू टय़ूब, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवून आणि माध्यमिक-उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे विविध अ‍ॅप्लिके शनद्वारे वर्ग घेतले जात आहेत. मात्र, इंटरनेटचा वेग न मिळणे, ध्वनिचित्रफीत सुरू न होणे अशा अनेक तांत्रिक अडचणी, अध्यापनासाठीच्या शैक्षणिक साधनांची जमावजमव, पाठाची तयारी, सतत ऑनलाइन राहावे लागण्याचा ताण शिक्षकांना येऊ लागला आहे.

ज्ञानप्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद नाईक म्हणाले, की ऑनलाइन शिक्षणासाठीचे तंत्र शिकण्याचा ताण येतो. झूमद्वारे अध्यापन करताना शैक्षणिक ध्वनिचित्रफिती तयार कराव्या लागत नसल्या तरी प्रत्येक विषयाच्या पीपीटी तयार कराव्या लागतात. त्याशिवाय तांत्रिक अडचणींचा त्रास आहेच. पण जवळपास दिवसभर शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपवर वेळ द्यावा लागतो. प्रत्यक्ष शाळेत एकावेळी सर्वाना सूचना देणे शक्य होते, पण ऑनलाइन शाळेमुळे विद्यार्थी-पालक दिवसभर व्हॉट्सअ‍ॅप किंवा दूरध्वनीवर संपर्क साधतात. त्यामुळे सकाळी आठ ते रात्री अकरा असे काम करावे लागत असल्याचा मानसिक ताण येत आहे.

‘वीस वर्षांहून अधिक काळ खडू-फळा पद्धतीने शिकवल्यानंतर अचानक संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने शिकवणे कठीण जाते. ऑनलाइन वर्गात कधी शिक्षकांच्या, तर कधी विद्यार्थ्यांच्या इंटरनेला अडचणी येतात. त्यामुळे चित्र न दिसणे, ऐकू न येणे असे प्रकार होत राहतात. कामाचा वेळ वाढल्याने पहिले दोन महिने जास्त तणावाचे होते. काहीवेळा ताणामुळे चिडचिडेपणाही होतो. मुलांना ऑनलाइन शाळेचा कंटाळा आला आहे आणि नेहमीप्रमाणे शाळा हवी आहे असे जाणवते,‘असे मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांनी सांगितले.

नागपूरमधील शिक्षिका तृप्ती पिदळी म्हणाल्या, ‘ऑनलाइन वर्ग जिकिरीचे आहे. प्रत्यक्ष शाळेतील कामांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. ऑनलाइन शिक्षणात मुले लक्ष देत नाही, गोंधळतात. त्यामुळे बारकाईने लक्ष ठेवावे लागते.  इंटरनेट जोडणीच्या अनेकदा समस्या असतात, आवाज येत-जात नाही, ध्वनिचित्रफीत थांबते. हे सारे त्रासदायक आहे. ऑनलाइन शिक्षण सोपे असल्याचा अनेकांचा समज असला, तरी शिक्षकांना जास्त मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागत आहे. पण हा त्रास सहन करून सध्याच्या काळात काम करण्याला पर्याय नाही.

पालकांकडून होणाऱ्या मूल्यमापनाचाही ताण

ऑनलाइन वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांबरोबर पालकही सोबत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्याची कौशल्ये, एकूण वागणुकीचे मूल्यमापन पालक करतात. काही पालक वर्ग सुरू असताना हस्तक्षेपही करतात. त्याचाही ताण येत असल्याची प्रतिक्रिया काही शिक्षकांनी बोलून दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 12:23 am

Web Title: online education puts stress on teachers abn 97
Next Stories
1 भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचे निधन
2 ‘एमपीएससी’कडून उमेदवारांना मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत
3 आरक्षणाच्या धोरणात्मक निर्णयानुसार ‘एमपीएससी’ची निवड प्रक्रिया
Just Now!
X