गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दोन टप्प्यांत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. अभिमत विद्यापीठाचा दर्जा असलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा १ जुलैपासून, तर प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल.

संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे म्हणाले, की गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत चार पदव्युत्तर पदवी आणि एक पदवी अभ्यासक्रम राबवला जातो. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी चाळीस विद्यार्थी असतात. गेले दोन महिने विद्यार्थ्यांशी परीक्षांबाबत ऑनलाइन चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केल्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थी आपल्या घरातूनच ही परीक्षा देतील.  संस्थेत झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमधून अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यांना रुजू होण्यासाठी पदवी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. तर काही विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशात जातात. या कारणांमुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली.

..तर पुन्हा परीक्षा

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर ऑनलाइन देखरेख केली जाईल. तर परीक्षेदरम्यान इंटरनेट कनेक्टिव्हिटी न मिळणे, वीज जाणे अशा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकतील. कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. जुलैमध्ये होत असलेल्या परीक्षा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या आहेत. त्यातील एकाही विद्यार्थ्यांने परीक्षा न देता पदवी मिळण्याबाबत लिहून दिलेले नाही.