करोना संकटाच्या काळात पडद्यामागच्या कलाकारांना काम मिळणे अवघड झाले आहे. अशा वेळी ‘एकमेका साह््य करू’ या तत्त्वावर पडद्यामागच्या कलाकारांसाठी ऑनलाइन व्यासपीठ करण्यात येत आहे.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. चित्रपटाचे चित्रीकरणही बंद पडले आहे. त्यामुळे पडद्यावर काम करणारे कलाकार सध्या घरामध्येच आहेत,तर पडद्यामागच्या कलाकारांच्या हाताला काम नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॅमेऱ्याच्यामागे काम करणाऱ्या कलाकारांसाठी ‘बॅकस्टेज कनेक्ट’ या नावाने संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे.

या संकेतस्थळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची तांत्रिक कामे करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचा समावेश असेल. पडद्यामागचे कलाकार आपली माहिती तयार करून ती या संकेतस्थळावर ठेवू शकतील आणि अन्य लोकांबरोबर ही माहिती वितरित करू शकतील. शहरांपासून ते छोट्या गावांमध्ये काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांना वैयक्तिकरीत्या किंवा कंपनीलाही आपली माहिती या संकेतस्थळावर ठेवता येणार आहे. या व्यासपीठाद्वारे पडद्यामागच्या कलाकारांची सूची होण्यास मदत होणार असून भविष्यात काम मिळण्यासाठी उपयोग होईल. हे संकेतस्थळ सर्वांसाठी विनामूल्य असेल. श्रीरंग खापर्डे आणि भाग्येश रानडे यांचे या कामामध्ये सहकार्य लाभत आहे, अशी माहिती प्रकाशयोजनाकार तेजस देवधर यांनी दिली.