सदनिका मालक आणि भाडेकरूंचा व्याप वाचणार; शंभर, पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील करार वैध नाही

सदनिका मालक आणि भाडेकरू यांच्यात केला जाणारा भाडेकरार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे मुद्रांक शुल्क भरून करणे कायदेशीर असून त्यासाठी विभागाकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यंत कमी शुल्क भरून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणे शक्य असून शंभर किंवा पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार वैध नसल्याचे स्पष्टीकरण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील लहान-मोठय़ा शहरांमध्ये नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आलेले नागरिक व विद्यार्थी भाडेतत्त्वावर सदनिका घेतात. त्याकरिता सदनिका मालक आणि भाडेकरू काही अटी व शर्ती शंभर किंवा पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर करार करतात. परंतु, त्याला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाकडे अत्यल्प शुल्क भरून करार करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच मुद्रांक शुल्क विभागाने ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरू एखाद्या सदनिकेवर दावा दाखवू शकतो, असा चुकीचा समज सदनिका मालकांनी करून घेतला आहे. भाडेकरूने अकरा महिने, एक वर्ष किंवा तीन वर्षे अशा कितीही कालावधीसाठी भाडेकरार केला, तरी त्याला संबंधित सदनिकेवर दावा सांगता येत नाही, असेही कवडे यांनी स्पष्ट केले आहे.

मुद्रांक शुल्क विभागाकडून भाडेकरारासाठी घर भाडय़ाच्या आणि अनामत रकमेच्या केवळ ०.२५ टक्के रक्कम आकारली जाते. तसेच मुद्रांक विभागाकडून केलेल्या कराराला कायदेशीर मूल्य आहे. त्यामुळे सदनिका भाडय़ाने घेणाऱ्या भाडेकरूंनी आणि घरमालकाने भाडेकराराचे शुल्क नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे भरावे. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधेचा लाभ घेऊन भाडेकरार करावेत, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी केले.

यामुळे फायदे..

ही सुविधा ऑनलाइन असल्याने मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात सदनिका मालक आणि भाडेकरू यांना येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळ वाचून वैध करार होऊ शकेल.