पुणे महापालिकेच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे आणि या सभागृहात येणारे नगरसेवक पक्षभेद विसरून पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहाचा उपयोग करून घेतात, असे नेहमी भाषणांमध्ये सांगितले जात असले, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे उघड झाले आहे. गेल्या अडीच वर्षांत १५७ नगरसेवकांनी मिळून मुख्य सभेला फक्त १८७ लेखी प्रश्न दिले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यातील फक्त तेरा प्रश्नांवरच सभागृहात चर्चा झाली.
महापालिकेच्या मुख्य सभेसाठी जी सभा कामकाज नियमावली तयार करण्यात आली आहे, त्या नियमावलीनुसार नगरसेवक मुख्य सभेला लेखी प्रश्न देऊ शकतात आणि त्या माध्यमातून अनेकविध विषयांची माहिती समोर येऊ शकते. दर महिन्याच्या मुख्य सभेचा जो दिनांक निश्चित होतो, त्यानुसार दिनांक ७ पर्यंत हे प्रश्न देता येतात. तशी लेखी सूचना दर महिन्याला नगरसेवकांना दिली जाते. मात्र, गेल्या अडीच वर्षांत नगरसेवकांनी या प्रक्रियेबाबत एवढी उदासीनता दाखवली आहे, की अडीच वर्षांत झालेल्या १६७ सभांसाठी नगरसेवकांनी फक्त १८७ लेखी प्रश्न सभेला दिले. सभा सुरू झाल्यानंतर आधी अर्धा ते एक तास तातडीच्या प्रश्नांवर चर्चा होते व त्यानंतर जे लेखी प्रश्न विचारलेले असतात त्यावर चर्चा होते. त्या प्रश्नांची उत्तरे संबंधित खात्याचे अधिकारी देतात. या प्रश्नोत्तरांमध्ये इतर नगरसेवकही सहभागी होऊ शकतात. मात्र, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याबाबतही नगरसेवक उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी या प्रश्नोत्तरांचीच माहिती चालू महिन्याच्या मुख्य सभेकडे लेखी स्वरूपात विचारली आहे आणि त्यातून ही माहिती पुढे आली आहे. फेब्रुवारी २०१२ पासून किती सभा झाल्या, या सभांमध्ये किती लेखी प्रश्न विचारले गेले आणि किती प्रश्नांवर चर्चा झाली या त्यांच्या प्रश्नांना १६७ सभा झाल्या, त्यात १८७ प्रश्न विचारले गेले आणि १३ प्रश्नांवर चर्चा झाली असे लेखी उत्तर नगरसचिव कार्यालयाने दिले आहे. त्यामुळे जरी प्रश्न विचारले गेले, तरी त्यावर चर्चा घडवण्याबाबतही आग्रह धरला जात नसल्याचे उघड झाले आहे.

माहिती संकलित होत आहे..
नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे अवघड वा प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचे असले वा गैरसोयीचे असले, की संबंधित प्रश्नाला उत्तर न देता उत्तर देण्यासाठी माहिती संकलित करण्यात येत आहे.. असे उत्तर दिले जाते. हे उत्तर ही स्पष्टपणे पळवाट असते आणि एकदा असे उत्तर दिले, की त्याबाबत नगरसेवकही पुन्हा कधी प्रश्न विचारत नाहीत, हे अधिकाऱ्यांना माहिती असल्यामुळे माहिती संकलित होत आहे ही पळवाट काढण्यात प्रशासन यशस्वी होते. नगरसेवकांनी विचारलेल्या १८७ प्रश्नांपैकी तब्बल ५१ प्रश्नांना माहिती संकलित केली जात आहे, असे उत्तर देण्यात आले आहे आणि ही माहिती संकलित झाली का नाही याबाबत त्यानंतर कोणताही खुलासा झालेला नाही.