मराठी माणूस नाटय़वेडा आहे, हे विधानच बेगडी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांनी बुधवारी व्यक्त केले. केवळ अडीच टक्के लोकांच्या आवडीचे साधन असलेले माध्यम हे वास्तव स्वीकारल्यावर मराठी माणसाला नाटकाचं वेड आहे, असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरेल, असा परखड सवालही त्यांनी केला.
सांगली येथे मंगळवारी विष्णूदास भावे सुवर्णपदकाने गौरविल्यानंतर नागपूरला रवाना होण्यापूर्वी एलकुंचवार काही काळ पुण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेतर्फे एलकुंचवार यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, सदस्या निकिता मोघे, नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि माजी आमदार उल्हास पवार या वेळी उपस्थित होते.
नागपूर येथे कोणत्याही चांगल्या नाटकाचे पाच प्रयोग होतात. याचाच अर्थ पाच हजार लोकांनी ते नाटक पाहिले असे म्हणता येते. नागपूरची लोकसंख्या ३५ लाख एवढी आहे. म्हणजे नाटक पाहणाऱ्यांची संख्या केवळ अडीच टक्के होते, याकडे लक्ष वेधून एलकुंचवार म्हणाले, साडेसत्त्याण्णव टक्के लोक नाटक पाहतच नाहीत हे वास्तव आहे. सुशिक्षित आणि ‘एलिट’ क्लास असलेल्या मध्यमवर्गाच्या आवडी-निवडी, त्यांचे अग्रक्रम आणि आस्थाविषय हे समाजाचे कसे होऊ शकतात. ‘मराठी माणूस नाटय़वेडा’ ही प्रतिमा आपणच केली आहे. तळागाळातील समाज आर्थिक स्थितीमुळे नाटय़गृहामध्ये येऊ शकत नाही. तर, उच्चभ्रू समाजाच्या मनोरंजनाच्या संकल्पना वेगळ्या असल्याने तो नाटकच पाहत नाही.
नाटककाराला रंगभूमीचा राजा समजतात. हे तितकेसे बरोबर नाही. नाटककार नसला आणि दिग्दर्शक नसला तरी नाटक होऊ शकते. नाटक साकारणारा नट आणि पाहणारा प्रेक्षक हे दोनच घटक महत्त्वाचे आहेत. डॉ. श्रीराम लागू रस्त्यावर उभे राहून ‘कुणी घर देता का घर’ असे म्हणू लागले, तर ते नाटक नाही का. मी संहिता दिग्दर्शक आणि नटाकडे देतो. त्या संहितेबरहुकूम प्रयोग होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी माझी नाही. नट रंगभूमीवर वेगळे काही करू लागला, तर त्यावर माझे काहीच नियंत्रण नसते. नाटकाची सिद्धी ही नटांमुळेच होते, असे सांगून एलकुंचवार म्हणाले, दिग्दर्शक हा स्वतंत्र अस्तित्व असलेला घटक आहे. पण, मी हा ताण घेत नाही. दिग्दर्शक कितीही मोठा असला, तरी त्याला संहितेसाठी नाटककाराकडेच जावे लागते. नट ५० वर्षांपर्यंत लोकांच्या लक्षात राहतो. दिग्दर्शक काही काळ स्मरणात राहतो. तर, लेखक हा किमान ४००-५०० वर्षे अस्तित्वात राहतो. लेखकाचे शेल्फ लाइफ जास्त असते यावर माझा विश्वास आहे.
म्हणून कलावंत मोठे
नाटकाने प्रेक्षकाला आनंद द्यावा की अस्वस्थ करावे यासंदर्भात भाष्य करताना महेश एलकुंचवार म्हणाले, पं. कुमार गंधर्व आणि किशोरीताईंचं गाणं ऐकल्यावर आपल्याला अस्वस्थता दाटून येते. त्यालाच मी आनंद म्हणतो. आइस्क्रीम खाल्ल्यावर आपल्याला सुख मिळते. पण, ते लगेच विरघळत असल्याने खाण्याचा आनंद मिळत नाही. सुख चिरकाल टिकत नाही. तर, आनंद दीर्घकाळ टिकतो. म्हणूनच हा आनंद देणारे कलावंत मोठे असतात.
मराठीमध्ये निरोगी परंपरा
एलकुंचवार म्हणाले, मी कुणाचाही वारसा चालवत नाही. आमच्याकडे विष्णूदास भावे ते धर्मकीर्ती सुमंत अशी नाटककारांची पंरपरा आहे. मी स्वतंत्र माणूस असल्याने वेगळ्या पद्धतीने लिहिणार. विजय तेंडुलकर यांच्यानंतरच्या पिढीमध्ये माझ्याबरोबर सतीश आळेकर आहेत. नंतरच्या पिढीमध्ये शफाअत खान, राजीव नाईक, मकरंद साठे आहेत. अन्य राज्यांमध्ये सीनिअर आणि ज्युनिअर यांच्यामध्ये भयंकर दरी दिसते ती आपल्या मराठीमध्ये नाही. तेंडुलकर माझ्यापेक्षा १२ वर्षांनी मोठे असले, तरी मी त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोलू शकत होतो. ही निरोगी परंपरा आपण जपली आहे.