सिंहगडावर पर्यटकांनी तीनच तास थांबावे, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत. सुट्टय़ांच्या दिवशी गडावर होणारी गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी या सूचना देण्यात आल्या असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंहगडाच्या वाहनतळाजवळच एक पाटी आता पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘पर्यटकांनी गडावर तीन तासांपेक्षा जास्त वेळ थांबू नये,’ असा फलकच वनविभागाने लावला आहे. तीनच तासांत वाहनतळापासून गडावर जाऊन, गड फिरून खाली येणे शक्य आहे का, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मात्र कोणीच असत नाही. मात्र, असा कोणताही नियम वनविभागाने केला नसून गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी दिलेली सूचना आहे, असे स्पष्टीकरण वनविभागाकडून करण्यात आले आहे.
शनिवार, रविवारी किंवा इतर सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी सिंहगडावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. वाहनतळावर जागा मिळण्यासाठी काही तास वाहनांना खोळंबून राहावे लागते. परिणामी घाटातही गर्दी होते. सिंहगडावर दोन वाहनतळ आहेत. मात्र, त्याची क्षमता फार नाही. मात्र, गडावरील वाहनतळ मोठे करणेही शक्य नाही. त्यामुळे गर्दीच्या दिवशी गडाखालीच वाहने अडवून वाहनतळावर जागा होईल, त्याप्रमाणे वाहने सोडली जातात. त्यामुळे अनेकदा पर्यटकांना वाहनतळावर जागा मिळण्यासाठी खोळंबून राहावे लागते. त्या पाश्र्वभूमीवर पर्यटकांसाठी काही वेळेची मर्यादा घालून गर्दीवर नियंत्रण ठेवता येते का, याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येत आहे.
याबाबत वनविभागातील अधिकारी सत्यजित गुजर यांनी सांगितले, ‘तीन तासांपेक्षा जास्त थांबू नये अशी सूचना देण्यात आली आहे. मात्र, हा नियम नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारे दंड आकारणी करण्यात येत नाही. गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.’