शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला, तर त्यांच्या वारसांना एक लाखाची रक्कम मिळवून देणारी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ सरकारने सुरू केली खरी, पण पुणे जिल्ह्य़ात त्याचा लाभ मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षभरात शेकडो शेतकऱ्यांचा अनैसर्गिक मृत्यू होत असला, तरी आताच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्य़ात केवळ ४४ शेतकऱ्यांनात्याचा लाभ मिळाला आहे.
राज्यात २००८ साली शेतकरी विमा योजना लागू करण्यात आली. अनैसर्गिक मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना त्याचा लाभ मिळतो. त्यात शेतकऱ्यांच्या निधनानंतर वारसांना एक लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. त्यासाठी महसूल विभाग दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्यामागे १८ रुपयांचा हफ्ता जमा करतो. अपघात, आत्महत्या, सापाच्या दंशामुळे मृत्यू किंवा इतर कोणत्याही अनैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर ही रक्कम दिली जाते. अलमंड इन्शुरन्स कंपनी आणि टाटा एआयजी या कंपन्यांकडून ही सुविधा पुरविली जाते. ही रक्कम मिळविण्यासाठी सात-बाराचा दाखला, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फेरफार, त्याच्या वारसाचा फेरफार आणि वयाचा पुरावा यासाठीची कागदपत्रे जोडावी लागतात. पुणे जिल्ह्य़ाचा विचार करता ही सुविधा मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अगदीच कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
२०१३-१४ या वर्षांसाठी पहिल्या सहा महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्य़ातील केवळ ४४ जणांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यातही मुख्यत: इंदापूर, दौंड, जुन्नर व बारामती या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.भोर, वेल्हा, मुळशी व हवेली तालुक्यांमध्ये प्रत्येकी शून्य किंवा एका व्यक्तीच्या वारसांना हा लाभ मिळाला आहे. त्यांच्याकडून यासाठी दाखल झालेल्या दाव्यांची संख्यासुद्धा नाममात्र होती. आधीच्या वर्षांमध्येसुद्धा कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र होते. २००९-१० या वर्षांत ५३ शेतकऱ्यांच्या वारसांना या विमा योजनेचा लाभ मिळाला. त्यानंतर २०१०-११ या वर्षी केवळ ८ जणांच्या वारसांना हा लाभ घेता आला. त्यानंतर २०१२-१३ या वर्षांत ११७ शेतकऱ्यांच्या वारसांना याचा लाभ घेता आला. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी राहुल जीतकर यांनी ही माहिती दिली.
 
‘माळीण’मधील ३३ जणांचे प्रस्ताव
आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळल्याच्या दुर्घटनेतील ३३ जणांचे प्रस्ताव विमा मिळविण्यासाठी पाठविण्यात येत आहेत. यापैकी १५ जणांचे प्रस्ताव आतापर्यंत पाठविले आहेत. आणखी १८ जणांचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत, असेही जीतकर यांनी सांगितले.
 
या योजनेत या वर्षी लाभ मिळेलेल्या शेतकऱ्यांची वारसांची तालुकानिहाय संख्या
हवेली        १
भोर        ०
मुळशी    १
मावळ        ३
वेल्हा        ०
खेड        २
आंबेगाव    २
जुन्नर        ७
शिरूर        ३
दौंड        ८
बारामती    ६
इंदापूर    ९
पुरंदर        २