टिळकांच्या अभ्यासिकेमध्ये पुतळ्याला कायमस्वरूपी जागा

पुणे : ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या अग्रलेखाद्वारे ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणारे लोकमान्य टिळक यांच्या हयातीमध्ये साकारण्यात आलेला एकमेव पुतळा टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी केसरीवाडय़ामध्ये दाखल झाला. केसरीवाडय़ातील लोकमान्य टिळक यांची अभ्यासिका या कायमस्वरूपी जागेमध्ये हा पुतळा विराजमान झाला आहे.

आरामखुर्चीमध्ये बसलेले लोकमान्य वर्तमानपत्राचे वाचन करीत असताना केशव लेले यांनी १९१९ मध्ये मुंबईच्या सरदार भवन येथे हा पुतळा साकारला होता. लोकमान्यांना समोर बसवून साकारलेला एकमेव आणि दुर्मीळ पुतळा हे वैशिष्टय़ असलेला हा पुतळा १०२ वर्षांचा आहे. लेले यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथील निवासस्थानी ठेवण्यात आलेला पुतळा शुक्रवारी टिळकांच्या निवासस्थानी दाखल झाला, अशी माहिती लेले यांचे पुत्र यशवंत लेले यांनी दिली. या पुतळ्याचे नूतनीकरण करणारे शिल्पकार अभिजित धोंडफळे, आमदार मुक्ता टिळक, लोकमान्य टिळक विचार मंचचे शैलेश टिळक आणि डॉ. चित्रा लेले या वेळी उपस्थित होते.

या पुतळ्यावरील कपडे आणि हातातील वर्तमानपत्र पाहताना पुतळा जिवंत वाटतो. लोकमान्यांचा खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचणारा पूर्णाकृती पुतळा ही लेले या प्रतिभासंपन्न कलाकाराची एकमेव उरलीसुरली मोठी कलाकृती आहे. गांधीहत्येनंतर समाजकंटकांनी के लेल्या दंगलीत लेले यांचे चलतचित्रे वापरून बनवलेले सर्व आगळेवेगळे देखावे नष्ट करण्यात आले होते. घरात ठेवलेला असल्याने हा पुतळा तेवढा वाचला. लेले कुटुंबाच्या दादर येथील निवासस्थानी सुमारे ८० वर्षे  हा पुतळा जतन करण्यात आला होता. मात्र,  मुंबईच्या दमट हवामानाचा परिणाम होऊन पुतळ्याचे नुकसान होऊ  नये म्हणून डॉ. चित्रा लेले यांच्या घरी हा पुतळा हलविण्यात आला होता, असे लेले यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक विचार मंचतर्फे प्रसिद्ध वास्तुविशारद किरण कलमदानी यांच्या मार्गदर्शनाखाली केसरीवाडा येथील लोकमान्यांचे निवासस्थान जतन करण्यात येत आहे. त्यातील लोकमान्यांच्या अभ्यासिकेमध्ये लोकमान्यांचा पुतळा विराजमान झाला आहे. करोना प्रादुर्भावामुळे या जतनीकरणाला विलंब झाला असला तरी लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षांची सांगता होण्यापूर्वी हा पुतळा लोकमान्यांच्या वास्तूमध्ये आला याचा आनंद आहे.

-भावना शैलेश टिळक 

सरदार भवन येथील निवासस्थानी आरामखुर्चीमध्ये बसलेल्या लोकमान्य टिळक यांचा पुतळा साकारला गेला तेव्हा त्यांच्या डोक्यावर पगडी नव्हती. मात्र, टिळक आणि पगडी हे समीकरण असल्याने या पुतळ्यातील टिळक यांच्या डोक्यावर पगडी ठेवण्यात आली आहे.

– यशवंत लेले , शिल्पकार के शव लेले यांचे पुत्र