|| शिवाजी खांडेकर

अनेक कामे अद्यापही अपूर्ण :- पिंपरी येथील महापालिकेने बांधलेल्या शंभर खाटांच्या जिजामाता बहु उपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे दोनदा उद्घाटन झाले. मात्र, अजूनही काम अर्धवट असल्याने नवीन विस्तारित इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे.

पिंपरी येथील डीलक्स चौकात महापालिकचे जिजामाता रुग्णालय आहे. या रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. इमारतीच्या कामासाठी महापालिकेने २७ कोटी रुपये खर्च केले आहेत. इमारतीचे काम पूर्ण झाले असले, तरी रुग्णालयातील फर्निचरचे काम अद्याप अर्धवट आहे. तसेच विद्युतीकरणाचे        कामही सुरू आहे. कामे अपूर्ण असतानाही सत्ताधारी भाजपने या विस्तारित इमारतीचे घाईघाईने उद्घाटन केले.

सप्टेंबरमध्ये तत्कालीन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटन होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही रुग्णालयातील कामकाज सुरू झालेले नाही.

जिजामाता रुग्णालयाचे कामकाज सध्या पिंपरी कॅम्पमधील महापालिकेच्या एका इमारतीमध्ये सुरू आहे. या इमारतीमध्ये असुविधा असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होते.

विस्तारित बहु उपचार रुग्णालयामध्ये शंभर खाटा उपलब्ध होणार आहेत. बाह्य़ रुग्ण विभागासह इतर विभाग सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी जिजामाता रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नवीन प्रशस्त इमारतीमध्ये रुग्णालय सुरू होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटन होण्याच्या आधी स्थानिक नगरसेवक डब्बू आसवानी यांनीही इमारतीमध्ये रुग्णालय सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ इमारतीचे उद्घाटन केले होते. अशाप्रकारे दोनदा उद्घाटन होऊनही नवीन इमारतीमध्ये रुग्णालय सुरू होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. इमारतीमधील फर्निचरचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिने एवढा कालावधी लागणार आहे.

फर्निचरचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिने लागणार आहेत. जानेवारीपर्यंत फर्निचरचे काम पूर्ण होईल त्यानंतर नवीन इमारतीध्ये रुग्णालय सुरू होईल.  – देवण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी महापालिका

इमारतीमधील फर्निचरचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच नवीन इमारतीत रुग्णालयाचे कामकाज सुरू होणार आहे.  – डॉ. पवन साळवे, वैद्यकीय विभाग प्रमुख, पिंपरी महापालिका