राज्यात सत्ता स्थापनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन ही पक्ष एकत्र येत आहेत. या तिन्ही पक्षांची मिळून निर्माण होणार्या महाशिवआघाडीकडून ठरवण्यात आलेल्या किमान समान कार्यक्रमात शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, हा मुद्दा वरच्या पातळीवर घेतले जावे अशी आमची आग्रही मागणी आहे. महाशिवआघाडीचा किमान समान कार्यक्रम जर आम्हाला योग्य वाटला तरच आम्ही या नव्या आघाडीत सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे घटक आहोतच. मात्र, सध्या भाजपाला बाजूला करून जी महाआघाडी निर्माण होऊ पाहते आहे. यातील किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्याचा मुद्दा वरच्या पातळीवर व प्रमुख रहावा अशी आमची आग्रही भूमिका आहे. कारण, निवडणुकीच्या कालवधीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासंन दिलेलं आहे. हा मुद्दा देखील किमान समान कार्यक्रमात आला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. या तिन्ही पक्षांनी बनवलेला किमान समान कार्यक्रम जर आम्हाला योग्य वाटला तरच आम्ही आघाडीच्या संदर्भात निर्णय घेऊ.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद व सत्तेतील समान वाटा या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. एवढेच नाही तर शिवसेनेने एनडीएलाही सोडचिठ्ठी देत, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघडीबरोबर जाऊन महाशिवआघाडीचे सरकार आणण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहे. .