शेलार मामा सुवर्णपदकासाठी पुणे विद्यापीठाकडून निकष प्रसिद्ध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदव्युत्तर विद्याशाखेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांला देण्यात येणाऱ्या शेलार मामा सुवर्णपदकासाठीच्या निकषांमध्ये विविध क्षेत्रातील नैपुण्याबरोबरच संबंधित विद्यार्थी शाकाहारी असावा, असा निकष लावण्यात आल्याचे पत्रक प्रसिद्ध होताच शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी विद्यापीठावर जोरदार टीका सुरू केली आहे. दरम्यान, या सुवर्णपदकाचे देणगीदार किंवा त्यांचे वारसदार यांच्याशी चर्चा करून आहाराच्या निकषाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आली.

पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी पदव्युत्तर विद्याशाखेतून सर्वोत्कृष्ट येणाऱ्या विद्यार्थ्यांला ‘ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलार मामा सुवर्णपदक’ तर विद्यार्थिनीला ‘त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक’ देण्यात येते. त्यासाठी शेलार कुटुंबीयांतर्फे विद्यापीठाला २००६ मध्ये एक लाख वीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली होती. त्यानंतर त्या वर्षी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बठकीत ही सुवर्णपदके देण्याबाबत ठराव करण्यात आला. या ठरावाला मंजुरी देताना काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार हे पदक दहावी, बारावी आणि पदवीमध्ये प्रथम अथवा द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांला दिले जावे, भारतीय संस्कृती, आचार, विचार, भारतीय परंपरा मानणाऱ्या व स्वत:च्या दैनंदिन आचरणात आणणाऱ्या, खेळांमध्ये पारितोषिके मिळविणाऱ्या, ध्यानधारणा, प्राणायम, योगासने करणाऱ्या आणि कला क्षेत्रात नपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदकासाठी विचार करण्यात यावा, या निकषांबरोबरच विद्यार्थी शाकाहारी आणि निव्र्यसनी असण्याचा निकष करण्यात आल्याने विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे.

‘अटी त्वरित काढून टाका’

‘कोणी काय खावे आणि खाऊ नये, हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला,’ अशी विचारणा केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, जनता दल युनायटेड, आरपीआय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे), आम आदमी पार्टी आदींनी विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पदके गुणवत्तेनुसार द्यावीत आणि जाचक अटी त्वरित काढून टाकाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या पदकासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज १५ नोव्हेंबपर्यंत विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात लिखित स्वरूपात पाठवायचे आहेत.

२००६ पासूनच अस्तित्वात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे ‘शेलारमामा सुवर्णपदक’ हे २००६ सालापासून देण्यात येते. त्यासाठीचे निकषही तेव्हापासूनच अस्तित्वात आहेत. त्या निकषांनुसार शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या तसेच, खेळाडू, निव्र्यसनी आणि शाकाहारी विद्यार्थ्यांला प्राधान्य दिले जाते. मात्र, कोणी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याबाबत विद्यापीठ कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही आणि मानतही नाही. त्यामुळे या सुवर्णपदकाचे देणगीदार किंवा त्यांचे वारसदार यांच्याशी चर्चा करून आहाराच्या निकषाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.