‘बक्षिसापेक्षाही श्रोत्यांना जिंकणे महत्त्वाचे.. स्वत:चे विचार मांडा.. व्यासपीठावर पडणाऱ्या पहिल्या पावलापासून तुमचा आत्मविश्वास आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्व श्रोत्यांना भावले पाहिजे..,’ अशी गुरूकिल्ली आणि ‘उत्तम वक्ता कसा असावा..’ याचा प्रत्यक्ष प्रत्ययच मान्यवरांच्या भाषणातून बुधवारी श्रोत्यांना आला. नाथे समूहाच्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पुणे विभागाच्या अंतिम फेरीची रंगत मान्यवर परीक्षकांच्या मार्गदर्शनाने वाढवली…
श्रोत्यांना जिंका- डॉ. रमेश पानसे
‘‘श्रोत्यांना काय आवडेल असं बोलणं महत्त्वाचं! भाषा, विचार, विषयाची खोली आणि मांडणी यांबरोबरच बोलण्याचा वेग हा मुद्दाही जागरूकपणे लक्षात घेतला पाहिजे. एखादा विषय ठराविक वेळेत संपूर्णपणे मांडणे नेहमीच शक्य नसते. त्यावेळी कोणते मुद्दे मांडता आणि ते कसे मांडता, हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या विषयाबाबत आपल्याला काय म्हणायचे आहे, ते मांडावे. इतरांच्या विचाराचे संदर्भ जरूर असावते. पण त्या पेक्षाही तुम्हाला काय म्हणायचे आहे, ते श्रोत्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी भाषा सोपी असावी. साधं, सरळ, समोरच्याला भावेल असं बोलाव. ते प्रभावी ठरतं. लिखित भाषा आणि बोली भाषा वेगळी असते, त्याचा विचार व्हायला हवा. भाषेच्या साध्या नियमांचा विचार व्हावा. कृत्रिम भाषा वापरू नका. भाषण ही एक प्रक्रिया आहे. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची आणि ते दुसऱ्याला कळण्याची. ‘आपल्याला बोलायचं आहे,’ याचं दडपण आणलं की बोलण्याचंच दडपण येतं. विनोदाचा प्रभावीपणे वापर करणेही महत्त्वाचे आहे. ‘बक्षीस नाही, तर श्रोत्यांना जिंकायचं असतं. त्याची प्रक्रिया महत्त्वाची, फलित नाही.’’
वक्तृत्वाने माणूस बदलू शकता- डॉ. अरूणा ढेरे
‘‘लिखित शब्दांचा इतिहास अलीकडचा आहे. मात्र, आपली मौखिक परंपरा मोठी आहे.  एखाद्या शब्दाने किंवा संबोधनाने समाज हलवल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत. पण हे कुणाच्या शब्दांनी होतं, तर ते शब्द प्रभावीपणे पोहोचवणाऱ्याच्या म्हणजेच वक्त्याच्या! आपल्या शब्दांमागे आपली भावना असणे आवश्यक असते. स्वत:चे विचार असतील तर ते मांडताना गोंधळ होत नाही. तुमचं बोलणं रसाळ होतं कारण तुमचं हृदय तेच बोलत असतं. मात्र, त्याचवेळी विषय समजून घेणं, सखोलता जाणणं आणि तार्किक मांडणी गरजेची आहे. आपण कुणासमोर बोलतो आहोत, श्रोते कोण आहेत याचा विचारही केला पाहिजे. आवाजात श्रोत्याला भारण्याची शक्ती असते. आपण जे वाक्य उच्चारतो, तेव्हा त्याचा तोलही सांभाळायला हवा. आपण जो विचार मांडत आहोत, तो विचार नेमकी कशाची मागणी करतो.. हे लक्षात आलं की आवाजाचा वापर चांगला करता येतो. वक्तृत्व म्हणजे संवाद साधणं. तुमचं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. माणसांना विधायक गोष्टींकडे वळवण्यासाठी वक्तृत्व कौशल्य वापरा. आपण जग बदलू शकत नाही; पण आपल्या संवादानं, वक्तृत्वानं एखादा माणूस बदलू शकतो आणि तो माणूस जग बदलू शकतो. तरुणांना ही संधी मिळवून देण्याचा ‘लोकसत्ता’चा हा एक उत्तम उपक्रम आहे.’’
आत्मविश्वास श्रोत्यांना भावला पाहिजे- डॉ. सदानंद बोरसे
‘‘मी थोडासा वक्तृत्वातला आणि थोडा नाटकातला आहे. जेव्हा सभेत भाषण करत असता, तेव्हा ती फक्त श्राव्य गोष्ट राहात नाही. वक्ता हा श्रोत्यांच्या समोर उभा असतो, तेव्हा ते दृक्-श्राव्य माध्यम होतं. व्यासपीठाची पायरी चढण्यापासून तो वक्ता उपस्थितांचं लक्ष वेधून घेतो. तुमच्या पहिल्या पावलापासून तुमचा आत्मविश्वास आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्व श्रोत्यांना भावलं पाहिजे. वक्तृत्व हे देखील एखाद्या संगीत मैफलीसारखं असतं. मैफल उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचून ती ओसरते, तसंच भाषणही ओघवतं असाव. या स्पर्धेमुळे मला माझ्या महाविद्यालयीन काळाची आठवण झाली. स्पर्धेचे विषय आव्हानात्मक होते. विषयांच्या मांडणीसाठी स्पर्धकांनी जो अभ्यास केला तो खरंच कौतुकास्पद होता. मला वाटत नाही, तयारीसाठी आम्ही एवढे कष्ट केले असते. वक्तृत्व ही गोष्ट बोलणं आणि ऐकणं एवढय़ापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. सादरीकरणाच्या काळात तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या गोष्टींचा वापर करा. जास्तीतजास्त अचूक माहितीचा आधार घ्या आणि त्या अनुषंगाने तुमचे विचार प्रभावीपणे मांडा. आम्ही स्पर्धेचा निकाल जाहीर केला. मात्र, आमचे निकष हे ब्रह्मवाक्य समजू नका. स्पर्धा ही कौशल्जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी असते. मात्र, तो शेवट नाही, हे लक्षात ठेवा.’’