कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग साठले आहेत. कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत या भागातील स्थानिक रहिवाशांनी बाजार समितीकडे तक्रारीही केल्या आहेत.

मार्केटयार्डातील प्रवेशद्वार क्रमांक चारच्या मागील बाजूस बेकायदा कांदा-बटाटा शेड उभारण्यात आले आहे. उन्हाळ्यात आंबा हंगामासाठी तेथे तात्पुरते शेड उभे केले जाते. आठवडय़ातून एक दिवस मोकळ्या जागेत जनावरांचा बाजार भरतो. त्यानंतर या जागेचा वापर केला जात नाही. मोकळी जागा असली तरी या जागेत कोणी कचरा टाकत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग  साठू लागले आहेत. परिसरातील चिकन विक्रेत्यांच्या दुकानातील कचरा, भंगार माल तेथे टाकण्यात येत आहे.

मोकळ्या जागेत डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. या भागात हमाल कामगारांची सोसायटी आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे कचऱ्याचे ढीग साठत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मार्केटयार्डातील कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले,

मोकळ्या जागेवर यापूर्वी कचरा साठत नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून तेथे मोठय़ा प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साठू लागले आहेत. मोकळ्या जागेलगत सोसायटय़ा आहेत. सोसायटीतील रहिवाशांना त्रास होत आहे.

कचरा टाकणाऱ्यांचा तपासच नाही

बाजार समितीच्या मोकळ्या जागेत जनावरांचा बाजार भरतो. आठवडय़ातून एक दिवस बाजार भरल्यानंतर इतर दिवशी या जागेचा वापर कोणी करत नाही. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून तेथे कचऱ्याचे ढीग साठू लागले आहेत. कचरा टाकणाऱ्याचा तपास लागत नाही. बाजार समितीच्या सुरक्षा व्यवस्थेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षारक्षकांनी कचरा टाकणाऱ्यांना पकडावे, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.