मान्यताप्राप्तच पदविका देण्याचा दावा करणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रमाणपत्राला राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने मात्र नाकारले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदविकेला मान्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षांसाठी प्रवेश देण्यात येत नसल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे गेली अनेक वर्षे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम दूरस्थ: पद्धतीने चालवला जातो. मात्र, हा अभ्यासक्रम चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यता विद्यापीठाने घेतलेल्या नाहीत. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे.
अभियांत्रिकी शाखेतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसऱ्या वर्षांल प्रवेश घेता येतो. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ही प्रवेश प्रक्रिया केली जाते. मात्र, जे अभ्यासक्रम शासनमान्य आहेत असेच अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पदविका प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे धोरण शासनाच्याच तंत्रशिक्षण विभागाने अवंलबले आहे. अभ्यासक्रम मान्यताप्राप्त नसल्यामुळे नियमानुसार या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देता येत नाही, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरूनच या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
नोकरी करत, दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला प्राधान्य असते. अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना त्याच्या मान्यतेबाबत माहिती नसणारे विद्यार्थी पुढे पदवी अभ्यासक्रमाला थेट प्रवेश घेण्यासाठी अर्ज करतात. मात्र, त्या वेळी पदवीला प्रवेश नाकारल्यानंतर फसवणूक झालेले विद्यार्थी न्यायालयात धाव घेतात. अशाप्रकारच्या शेकडो याचिका अद्यापही उच्च न्यायालयात आहेत.