‘कोणत्याही कलेचा काळानुसार विचार व्हायला हवा. ताल, सूर, लय या मूलभूत गोष्टींना, मूलतत्त्वांना धक्का न लावता आपली शैली विकसित करणे आणि काळानुसार सादरीकरण बदलण्याची परंपरा किराणा घराण्याने राखली आहे आणि हेच त्याचे वैशिष्टय़ आहे,’ असे मत ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी गुरूवारी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातर्फे विभागीय संशोधन प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या किराणा घराणा संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये डॉ. अत्रे बोलत होत्या. या वेळी विद्यापीठ विकास मंडळाचे (बीसीयूडीचे) संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, ज्येष्ठ गायक पं. चंद्रकांत कपिलेश्वरी, श्रीनिवास जोशी, ‘लोकसत्ता’ चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. अत्रे म्हणाल्या,‘‘जीवनशैलीनुसार संगीत बदललेले आपल्याला दिसते. सादरीकरणाची पद्धत, शैली यांमध्ये काळानुसार बदल होत गेले. मूलभूत तत्त्वांना धक्का न लावता काळानुसार बदलणे हे किराणा घराण्याचे वैशिष्टय़ आहे. कलेच्या निर्मितीला शास्त्राचा आधार आहे. मात्र, फक्त शास्त्रामध्ये न अडकता सादरीकरणासाठी नवी वाट चोखाळणेही गरजेचे आहे.
गाणे ऐकण्याची गोष्ट आहे, चर्चेची नाही हे जरी खरे असले, तरी ते समजावून सांगणेही आवश्यक आहे. गाणे ऐकताना निर्माण होणारे समज-गैरसमज दूर होण्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे.’’
या वेळी श्रीनिवास जोशी म्हणाले,‘‘सूर, टोन, आवाज यांची सौंदर्यपूर्ण रचना किराणा घराण्यामध्ये दिसते. सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर यांनी संगीतातील नवे प्रवाह स्वीकारले. पं. भीमसेन जोशींनी त्यांच्या सादरीकरणातून वेगळी शैली निर्माण केली. त्याचवेळी नव्या तंत्रज्ञानाची जाणही ठेवली. या सगळ्यातून किराणा घराणे अधिक प्रगल्भ झाले. गायनासाठी असलेल्या बंधनातूनही गायकीचा कस लागला आणि त्या आव्हानामुळेही अनेक स्थित्यंतरे झाली.’’
या वेळी संगोराम म्हणाले,‘‘प्रत्येक घराण्यामध्ये त्याचा केंद्रबिंदू महत्त्वाचा असतो. वैचारिक दृष्टिकोन आणि सौंदर्यदृष्टी हे दोन्ही किराणा घराण्यामध्ये दिसून येते. काहीतरी वेगळे करून पाहण्याची ऊर्मी किराणा घराण्यातील गायकांमध्ये होती. गायकांनी सगळे संगीत प्रकार आपलेसे केले. त्यातून प्रत्येकाची स्वतंत्र शैली तयार झाली. मात्र, त्यांचा केंद्रबिंदू टिकून होता. याचे कारण या घराण्यातील गायकांना स्वातंत्र्य मिळाले. ते त्यांनी उपभोगले, पण त्याचबरोबर येणारी जबाबदारीही स्वीकारली.’’  या वेळी पं. कपिलेश्वरी यांनी त्यांचे वडील बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘गाण्यातून श्रोत्यांशी संवाद साधता आला पाहिजे. किराणा घराण्याच्या गायकांमध्ये हे वैशिष्टय़ दिसून येते,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात पं. व्यंकटेशकुमार यांचे गायन झाले.